ठेकेदाराकडून भोजनपुरवठ्यात विलंब
ताटे धुण्यापासून इतर कामांचाही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर भार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील रुग्णांना निर्धारित वेळेत नाश्ता आणि जेवण मिळत नसल्याची तक्रार समोर आली आहे. भोजनपुरवठा उशिराने होत असल्याने रुग्णांना जेवणासाठी प्रतीक्षा करावी लागत असून, भोजन वितरणानंतरची भांडी स्वच्छ करण्याचे कामही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर पडत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. या प्रश्नांसह कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी म्युनिसिपल मजदूर संघटना वैद्यकीय अधीक्षकांची भेट घेणार आहे.
याविषयी मुख्य वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत पवार यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. रुग्णालयात सकाळी ९ ते ११ या वेळेत नाश्ता, तर दुपारी १.३० ते २ या वेळेत जेवण देण्याचे नियोजन आहे, मात्र ठेकेदाराकडून भोजनाचा पुरवठा वेळेत होत नसल्याने या वेळापत्रकाचा फटका रुग्णांना बसत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांना औषधे आणि तपासण्यांच्या वेळेशी आहाराचे वेळापत्रकही जोडलेले असते. त्यामुळे भोजनाला होणारा विलंब रुग्णांच्या दैनंदिन उपचार व्यवस्थेवर परिणाम करणारा ठरत असल्याची बाब कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणली आहे.
म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर म्हणाले की, रुग्णांना वेळेत नाश्ता आणि जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने येत आहेत. भोजनाच्या कामाचा अतिरिक्त भारही कर्मचाऱ्यांवर टाकला जात आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवरही निर्णय झालेला नाही. यापूर्वी चर्चा होऊनही अंमलबजावणी न झाल्याने वैद्यकीय अधीक्षकांची भेट घेऊन या प्रश्नांकडे पुन्हा लक्ष वेधणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
कामाची वेळ संपल्यानंतरही थांबावे लागते
भोजनाचे वितरण झाल्यानंतर ताटे आणि भांडी स्वच्छ करण्याची जबाबदारीही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर येत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे नियमित कामाची वेळ संपल्यानंतरही कर्मचाऱ्यांना रुग्णालयात थांबावे लागत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. याशिवाय वॉर्ड बॉय आणि आया यांची पदे अपुरी असल्याने सफाई कर्मचाऱ्यांकडून इतर कामे करून घेतली जात असल्याचा आरोप आहे. परिणामी सफाईची नियमित कामे प्रभावित होत असून, त्याचा ठपका पुन्हा संबंधित कर्मचाऱ्यांवर ठेवला जात असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे.
इतर मागण्याही प्रलंबित
भोजनाच्या प्रश्नाबरोबरच कर्मचाऱ्यांचे धुलाई, शिलाई आणि एनडीटी भत्ते, पदोन्नती, वेतनश्रेणीतील विसंगती, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी तसेच सेवानिवृत्त आणि निधन झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित दावे निकाली काढण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांवर यापूर्वी चर्चा होऊनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा दावा संघटनेने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.