डॉक्टरांच्या नोंदणीसाठी सहा दिवसांचे उद्दिष्ट
राज्यात पाच ते सहा प्रादेशिक केंद्रांचा प्रस्ताव; ग्रामीण भागातील उमेदवारांना दिलासा
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेतील विलंब कमी करण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून नोंदणीची प्रक्रिया दोन ते सहा दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रलंबित अर्जांचा जलद निपटारा करण्याबरोबरच राज्यातील डॉक्टर आणि वैद्यकीय नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी पाच ते सहा प्रादेशिक केंद्रे सुरू करण्याचा प्रस्तावही महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मांडणार आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय कदम यांनी सांगितले की डॉक्टरांना नोंदणी देणे आणि वैद्यकीय निष्काळजीच्या तक्रारींची चौकशी करणे ही परिषदेची प्रमुख कामे आहेत. नोंदणी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, काही अर्जांमध्ये विद्यापीठे, अन्य वैद्यकीय परिषदा आणि राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून प्रमाणपत्रांची पडताळणी करावी लागते. संबंधित संस्थांकडून वेळेत माहिती उपलब्ध न झाल्यास अर्ज प्रलंबित राहतात. त्यामुळे या यंत्रणांशी समन्वय वाढविण्यावरही भर दिला जाणार असल्याचे डॉ. कदम यांनी स्पष्ट केले.
२०० ते २५० किलोमीटरच्या अंतरात सेवा
नोंदणीसाठी कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी ग्रामीण आणि दुर्गम भागातील उमेदवारांना मुंबईपर्यंत यावे लागते. ही गैरसोय कमी करण्यासाठी राज्यात पाच ते सहा प्रादेशिक केंद्रे सुरू करण्याचा विचार आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह विविध भागात ही केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. साधारण २०० ते २५० किलोमीटरच्या अंतरात नोंदणीशी संबंधित सेवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न असेल. हा प्रस्ताव सध्या प्राथमिक टप्प्यात आहे.
तक्रारींचाही जलद निपटारा
वैद्यकीय निष्काळजीच्या तक्रारींचा जलद आणि निष्पक्ष निपटारा करण्यावरही महाराष्ट्र वैद्यकीय परिषद भर देणार आहे. डॉक्टरांची चूक नसताना त्यांच्यावर अन्याय होऊ नये आणि उपचारातील निष्काळजी सिद्ध झाल्यास नियमानुसार कारवाई व्हावी, यासाठी चौकशी प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याची गरज आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या १८ सदस्यीय मंडळामार्फत प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.