विक्रमगडमधील भातशेती संकटात
पावसाच्या खंडाने भातशेती धोक्यात; उत्पादन घटण्याची भीती
विक्रमगड (बातमीदार) : पावसाचे उशिरा झालेले आगमन आणि त्यानंतर पडलेल्या खंडामुळे विक्रमगड तालुक्यातील भातशेती संकटात सापडली आहे. जूनमध्ये कमी पाऊस झाल्याने पेरणी व भातलावणीला उशीर झाला, तर सप्टेंबरमध्येही पावसाने दडी मारल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या भातपीक लोंबीवर आले असून, दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, शासनाने शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून निकषांनुसार दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
विक्रमगड तालुका प्रामुख्याने भातशेतीवर अवलंबून असून, येथील अनेक आदिवासी शेतकरी कुटुंबांची वर्षभराच्या अन्नधान्याची गरज भातपिकाच्या उत्पादनावर अवलंबून असते. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने शेतीची कामे लांबली. त्यातच पावसाने लवकर उघडीप दिल्याने पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर जमिनीतील ओलावा कमी झाला आहे.
दाणे भरण्याच्या टप्प्यावर पाण्याची कमतरता
भातपिकाला लोंबी आल्यानंतर दाणे भरण्याच्या काळात पुरेसा ओलावा आवश्यक असतो, मात्र याच टप्प्यावर पावसाचा खंड पडल्याने दाण्यांची वाढ अपुरी राहण्याची आणि उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. सिंचनाच्या पर्यायी सुविधा मर्यादित असल्याने अनेक शेतकऱ्यांना पावसावरच अवलंबून राहावे लागते. उत्पादन घटल्यास खरीप हंगामासाठी केलेला खर्च वसूल करणेही कठीण होण्याची शक्यता आहे.
रब्बी हंगामावरही परिणामाची भीती
जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला असला, तरी जून आणि सप्टेंबरमधील पावसाच्या कमतरतेचा भातशेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भात उत्पादन घटल्यास वर्षभराच्या धान्याची गरज भागविण्यासह आगामी रब्बी हंगामासाठी आर्थिक तरतूद करणेही शेतकऱ्यांना कठीण होऊ शकते. त्यामुळे पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया
“पाऊस उशिरा सुरू झाल्याने पेरणीही उशिरा झाली. त्यानंतर पावसाने लवकर उघडीप दिल्याने भातशेतीवर परिणाम झाला आहे. लोंबीवर असलेल्या पिकाला पाणी न मिळाल्याने दाणे भरण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे.”
- अनिल गोविंद, शेतकरी, विक्रमगड
“जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला; मात्र जून आणि सप्टेंबर कोरडे गेल्याने भातपिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आगामी रब्बी हंगामावरही होऊ शकतो. त्यामुळे शासनाने प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचे मूल्यांकन करावे आणि दुष्काळ जाहीर करावा.”
- विकास सांबरे, शेतकरी, विक्रमगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.