कळंबोलीतील पाणीप्रश्नासाठी मनसेचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू
महिलांसह नागरिकांचा पाठिंबा, नियमित पाणीपुरवठ्याची मागणी
पनवेल, ता. १४ (बातमीदार) ः कळंबोली वसाहतीतील अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर मनसेच्या वतीने सुरू करण्यात आलेले बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. मनसेचे शाखाध्यक्ष स्वप्नील घाडगे यांनी सिडको प्रशासनाविरोधात हे आंदोलन छेडले असून, या उपोषणाला स्थानिक नागरिकांसह महिलांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे.
कळंबोलीतील विविध भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना दैनंदिन कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. ६ ऑक्टोबरला घाडगे यांनी सिडकोच्या कळंबोली पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणीप्रश्नाबाबत जाब विचारला होता. त्या वेळी समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास उपोषण सुरू करण्याचा इशाराही देण्यात आला होता. दरम्यान, मुदत संपल्यानंतरही ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा दावा करीत सिडको कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. कळंबोलीतील पाणी समस्येवरून मनसेचे प्रभाग क्रमांक ४ चे प्रमुख शिवम पाटील यांनीही लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, उपोषणाच्या पार्श्वभूमीवर कळंबोली पोलिसांनी स्वप्नील घाडगे यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. मात्र, कळंबोलीतील पाणीपुरवठा नियमित आणि सुरळीत होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका मनसेने घेतली आहे. आता या आंदोलनाची सिडको प्रशासन कितपत दखल घेते आणि पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करते, याकडे कळंबोलीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.