जिल्ह्यात आर्थिक समावेशन मोहीम
२१ ऑक्टोबरपासून उपक्रम; बँकांना निधी नियोजनाच्या सूचना
अलिबाग, ता. १४ (वार्ताहर) : केंद्र शासनाच्या आर्थिक समावेशन योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रायगड जिल्ह्यात २१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बँकांनी ग्रामपंचायती आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधून शिबिरांचे आयोजन करावे, नागरिकांमध्ये जनजागृती करावी आणि आवश्यक निधीची तरतूद वेळेत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
रायगड जिल्ह्यातील बँकांच्या कामकाजाचा, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आणि कृषी कर्जवाटपाचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय सल्लागार समिती व जिल्हास्तरीय आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या वेळी मोहिमेंतर्गत ग्रामपंचायती आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या केंद्रांचे संबंधित बँकांना वाटप करण्यात आले.
बैठकीस बँक ऑफ इंडियाचे उपविभागीय व्यवस्थापक भरत सहाय, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक प्रदीप आपसुंडे, जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त गुरूशांत हरळया, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त जलील अहमद, आरएसईटीआयचे संचालक सुमित धनोरकर आणि अग्रणी जिल्हा व्यवस्थापक सुधीर गायकवाड यांच्यासह विविध बँकांचे जिल्हा समन्वयक, शासकीय अधिकारी व बँक प्रतिनिधी उपस्थित होते.
कृषी कर्जवाटपाला गती देण्याचे निर्देश
बैठकीत जिल्ह्यातील पीक कर्जवाटप, वार्षिक पत आराखड्याची उद्दिष्टपूर्ती, किसान क्रेडिट कार्डअंतर्गत कर्जवाटप आणि विविध शासकीय योजनांतील प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी किसान क्रेडिट कार्ड तसेच अन्य कृषी कर्जांचे वितरण जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
कर्जमाफी योजनेंतर्गत प्रलंबित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लागू असलेल्या मदत व सवलतींचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील आरएसईटीआयच्या वार्षिक अहवालाचे अनावरण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.