मुंबई, ता. १४ : ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील जांभूळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित जमिनीवर त्यांचे स्मारक विकसित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. हा प्रस्ताव सादर झाल्यानंतर महसूल विभागाशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
जांभूळ येथील संबंधित सुमारे ५० एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी ठाणे येथील डॉ. बी. आर. आंबेडकर प्रतिष्ठानने केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ मध्ये जांभूळ येथे जमीन खरेदी केली होती. निवडणूक लढविण्यासाठी जमीनधारणा आवश्यक असल्याच्या तत्कालीन तरतुदींच्या पार्श्वभूमीवर ही जमीन खरेदी करण्यात आली होती. पुढे ही जमीन विकण्यात आली. मात्र, १९३६ ते १९४२ या कालावधीत बाबासाहेबांचे या परिसराशी वास्तव्याच्या माध्यमातून नाते जोडले गेले होते.
या मागणीच्या अनुषंगाने विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बुधवारी (ता. १४) बैठक पार पडली. या बैठकीस सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभाग सचिव हर्षदीप कांबळे, जलसंपदा विभागाचे सचिव प्र. बा. मिसाळ, समाजकल्याण (मुंबई विभाग) प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, ठाण्याचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे, कल्याण उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी वृषाली पाटील यांच्यासह प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल हंडोरे, सचिव कुसुम गौतम यांच्यासह महिला व बालविकास तसेच सामाजिक न्याय विभाग आणि अन्य विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जांभूळ येथील या जमिनीचा प्रश्न प्रशासकीय समन्वयातून मार्गी लागल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
- अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष, विधानसभा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.