सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : महापालिका क्षेत्राचे झपाट्याने होणारे विस्तारीकरण, त्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे यामुळे पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे. दुसरीकडे त्या तुलनेत होणारा पाणीपुरवठाही कमी आहे. अशातच आता, एल निनोच्या सावटामुळे पाणीकपात प्रस्तावित केली आहे. ठाणेकरांना पुरेसे पाणी देण्यात अपयशी ठरत असलेल्या यंत्रणांसमोर आता आणखी मोठे आव्हान उभे राहिले आहे. सध्याच्या घडीला ४७ दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात असताना, १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात लागू झाल्यास आणखी सुमारे ५९ दशलक्ष लिटर पाणी कमी होऊ शकते. परिणामी, एकूण तूट दररोज १०६ दशलक्ष लिटरपर्यंत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सुमारे २७ लाखांवर पोहोचली आहे. शहराला दररोज ६२१ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना उपलब्ध पुरवठा ५८५ दशलक्ष लिटरच्या आसपास आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. सध्याची तूट ४७ दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात असताना, १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात लागू झाल्यास आणखी सुमारे ५९ दशलक्ष लिटर पाणी कमी होऊ शकते. परिणामी, एकूण तूट दररोज १०६ दशलक्ष लिटरपर्यंत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. हा तुटवडा प्रत्यक्षात उतरल्यास नागरिकांना उपलब्ध पाण्यातच दिवस काढण्याची वेळ येऊ शकते. तर, याचा कळवा, मुंब्रा, दिवा आणि घोडबंदरसह शहरातील विविध भागांतील नागरिकांची पाण्यासाठीची फरफट वाढण्याची शक्यता आहे. आधीच अपुऱ्या पुरवठ्यामुळे हैराण झालेल्या ठाणेकरांच्या माथी आता पाणीटंचाईचे दुहेरी संकट पडण्याची चिन्हे आहेत.
नियोजनाचा कस
एमआयडीसीकडून १५ ऑक्टोबरला शटडाऊनचे नियोजन करण्यात आले आहे. या यंत्रणेकडून कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसराला सुमारे १३५ दशलक्ष लिटर पाणी मिळते. त्यामुळे या भागांतील पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, स्टेम आणि मुंबई महापालिकेकडूनही १६ ऑक्टोबरपासून पाणीकपातीचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे.
पदरी केवळ पाच दशलक्ष लिटर
घोडबंदर परिसरातील वाढती गरज लक्षात घेऊन मुंबई महापालिकेकडे ५० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ पाच दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळाल्याने माजिवडा-मानपाडा परिसराचा पुरवठा ११५ वरून १२० दशलक्ष लिटर झाला. वाढत्या गरजेच्या तुलनेत ही वाढ अपुरी ठरत असल्याने पाणीपुरवठ्याचे गणित अद्याप सुटलेले नाही.
पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश
किमान १० टक्के कपात, पाणीगळती रोखणे, जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर यावर भर देण्यात येणार आहे. मात्र, कागदावरील नियोजन प्रत्यक्षात कितपत उतरणार, हा प्रश्न कायम आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यापूर्वी उपलब्ध पाण्याचे समतोल वितरण, गळतीवर नियंत्रण आणि पर्यायी पुरवठ्याची व्यवस्था याबाबत महापालिकेला ठोस पावले उचलावी लागणार आहेत.
कुठे, किती दैनंदिन पाणीपुरवठा?
परिसर वितरण (दशलक्ष लिटर)
माजिवडा-मानपाडा (घोडबंदर) १२०
वर्तकनगर ६५
कळवा ६८
दिवा ६५
मुंब्रा ६८
वागळे इस्टेट ५३
लोकमान्य-सावरकरनगर ४५
उथळसर ५५
नौपाडा ५१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.