सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : नवरात्रोत्सव आणि आगामी दिवाळीची लगबग सर्वत्र असतानाच ठाणे जिल्ह्याला उद्या (ता. १६)पासून पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. एल-लिनोच्या धर्तीवर पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले असले, तरीही बारवी धरणात ९८.८३ टक्के, तर भातसा धरणात ९६.५३ टक्के पाणीसाठा आजच्या घडीला उपलब्ध आहे. त्यामुळे भरलेली धरणे उराशी असतानाही जिल्हावाशियांच्या घशाला ऑक्टोबरपासूनच कोरड लागण्यास सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अंबरनाथ विभागाने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ, बदलापूर औद्योगिक क्षेत्र, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच परिसरातील अन्य ग्रामपंचायती आणि नागरी वस्त्यांचा पाणीपुरवठा शुक्रवारी (ता. १६) २४ तास बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेलाही कपातीचा सूचना देण्यात आल्या आहेत. एमआयडीसीच्या सूचनेनुसार, २२ ऑक्टोबरपासून आठवड्यातून प्रत्येक गुरुवारी रात्री १२ ते शनिवारी दुपारी १२ या ३६ तासांच्या कालावधीत पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येणार आहे. उपलब्ध जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पण ठाणे जिल्ह्याला खरंच अशा कपातीची गरज आहे का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
पावसाळा संपल्यानंतर धरणांतील साठा हा उन्हाळ्यापर्यंतचा आधार असतो. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या धरणांच्या स्थितीनुसार बारवी धरणात ९८ टक्क्यांपेक्षा जास्त, तर भातसा धरणामध्ये ९६ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, पुढील पावसाचे आगमन लांबल्यास हाच साठा शहरांची तहान भागविण्यासाठी जपून वापरावा लागेल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत जलसाठ्याचे नियोजन करण्यावर सरकारने भर दिला जात असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिले आहे.
पाणी बचतीसाठी काटकसर
१. प्रमुख जलाशयांमध्ये १० टक्के जिवंत साठा आपत्कालीन वापरासाठी राखून ठेवण्याची तरतूद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणीपुरवठ्यात किमान १० टक्के कपात करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
२. ठाणे शहरासह जिल्ह्यातील विविध नागरी आणि औद्योगिक क्षेत्रांची पाण्याची गरज मोठी आहे. उद्योगांनी त्यांच्या एकूण पाणी वापरापैकी किमान ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक केले आहे.
४. उद्याने, बांधकामे आणि रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर वाढविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
५. धरणांतील साठा समाधानकारक असला, तरी पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरविण्यासाठी आतापासूनच काटकसर करण्याची भूमिका घेण्यात आली आहे.
धरणांचा उपयुक्त साठा पाणीसाठा (दलघमी) टक्के
बारवी ३३४.८६० ९८.८३
भातसा ९०९.४५० ९६.५३
आंध्रा ३२६.८९० ९२.७०
तानसा १३१.१०४ ९०.३७
मोडकसागर ८०.०३२ ६२.०८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.