एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची
आमदार रईस शेख यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेदरम्यान सुमारे १२ हजार मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न होत आहे, असा गंभीर आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे.
एसआयर प्रक्रिया रद्द करावी, मतदार यादीतील अनियमिततांची चौकशी करावी आणि बूथस्तरीय अधिकाऱ्यांच्या कामाची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
१.९१ लाख मतदारांची नोंद असल्याचा दावा
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुमारे दोन लाख ६९ हजार मतदार होते. त्यानंतर ही संख्या वाढून सुमारे तीन लाख ७६ हजारांपर्यंत पोहोचली, मात्र सध्या एसआयआर प्रक्रियेनंतर मतदार यादीत केवळ एक लाख ९१ हजार मतदारांची नावे शिल्लक असल्याचा दावा त्यांनी केला. या आकडेवारीतील मोठ्या फरकाची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक नागरिकांनी एन्युमरेशन फॉर्म भरून दिले असतानाही त्यांची नावे यादीतून वगळण्यात आल्याच्या तक्रारी आहेत, तर काही फॉर्म गहाळ झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामुळे बीएलओ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करून अनियमितता आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
..
एसआयआर प्रक्रियेमुळे अल्पसंख्याकांसह दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय समाजातील मतदार प्रभावित होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया रद्द करावी.
- रईस शेख, आमदार, सपा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.