पूर्णेकर हत्या प्रकरण
दरवाजा उघडा ठेवण्यासाठी पप्याने घातले शूज!
तपासातून घटनाक्रम उलगडला; गोळीबारानंतर केले चॉपरने वार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात तपासातून नवनवीन माहिती समोर येत आहे. हत्येच्या दिवशी नेहमी चप्पल घालणारा सुभाष उर्फ पप्या शिंदे शूज घालून कार्यालयात आला होता. पूर्णेकर यांच्या केबिनचा दरवाजा उघडा ठेवता यावा, यासाठी त्याने शूज न काढताच केबिनमध्ये प्रवेश केल्याची माहिती पोलिस तपासातून गुरुवारी (ता. १५) समोर आली आहे.
हत्येच्या आदल्या दिवशी पप्प्या चप्पल घालून पूर्णेकर यांच्या कार्यालयात आला होता. केबिनमध्ये जाण्यापूर्वी त्याने चप्पल बाहेर काढली होती. त्यावेळी कार्यालयाबाहेर बसलेल्या पूर्णेकर यांच्या एका कार्यकर्त्याने त्याची चप्पल घालून लघुशंकेसाठी गेल्याने पप्प्याने त्याला झापले होते; मात्र, हत्येच्या दिवशी पप्प्या शूज घालून आला. त्याने शूज न काढताच केबिनमध्ये प्रवेश केला आणि दरवाजा उघडा राहावा, यासाठी पाय बाहेर काढून तो पूर्णेकर यांच्यासमोर बसल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
याचदरम्यान संतोष कनोजिया उर्फ टल्ली तेथे आला. त्याने पप्प्याला वाढदिवसाला येण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर नितेश पवार उर्फ भावड्या तेथे पोहोचला. या दोघांनी संधी साधून पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर निखिल यादव आणि अमित सिंह उर्फ पपलू यांनी चॉपरने वार केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. हत्येपूर्वी कनोजिया आणि पवार हे पप्प्याच्या दुचाकीवरून परिसरात आल्याचे सीसीटीव्ही चित्रणात दिसून आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. हत्येनंतर आरोपींना पसार होण्यासाठी पप्प्याने चारचाकी वाहनाची व्यवस्था केली होती. तसेच, एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी कनोजिया याला नवीन मोबाईलही पुरविण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
--
सहा गोळ्या झाडल्या; घटनास्थळी पाच पुंगळ्या
कनोजिया आणि पवार यांनी केलेल्या गोळीबारात एकूण सहा गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. त्यापैकी दोन गोळ्या पूर्णेकर यांना लागल्या. घटनास्थळी पाच पुंगळ्या आढळल्या, तर एक राउंडही मिळून आला. हा राउंड ७.६२ मिमीचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
----
कनोजियाच्या पायावरील बँडेजचे कारण शस्त्रक्रिया
गोळीबारादरम्यान उलटलेली गोळी कोणालाही लागली नसल्याचे प्रयागराज येथून दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी सांगितले होते. मात्र, गोळी लागण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी त्या दिशेनेही तपास केला. अटकेनंतर कनोजियाच्या पायाला बँडेज बांधलेले दिसून आले. हत्येच्या काही दिवस आधी पायावरील फोडावर शस्त्रक्रिया केल्यामुळे बँडेज बांधल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
--
पनवेलपासून प्रयागराजपर्यंत आरोपींचा प्रवास
हत्येनंतर पसार होण्यासाठी पप्प्याने चारचाकी वाहनाची व्यवस्था केली होती. पप्प्याला वगळून अन्य चार आरोपी या वाहनातून पनवेलपर्यंत गेले. एमजीएम रुग्णालयाजवळ वाहन सोडल्यानंतर त्यांनी दोन-दोनच्या गटांत वेगवेगळ्या दिशांनी पळ काढला. त्यातील दोघांना कर्नाळा परिसरात पकडण्यात आले. तर कनोजिया आणि अमित सिंह यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना हात दाखवत पुण्यापर्यंत प्रवास केला. पुण्यातून रेल्वेने उत्तर प्रदेशात पोहोचल्यानंतर दोघांनी मंदिरात लपून राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केली. हत्येचा कट, आरोपींच्या हालचाली आणि पसार होण्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
----
आरोपींना भरचौकात फाशी द्या : प्रताप सरनाईक
हत्या प्रकरणातील आरोपींना भरचौकात फाशी दिली पाहिजे, अशी भूमिका परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. या घटनेचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. या प्रकरणाच्या तपासात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचा दावा सरनाईक यांनी केला. शिंदे यांचा हस्तक्षेप असता, तर मीनाक्षी शिंदे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले नसते, असे ते म्हणाले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याच्या स्पष्ट सूचना शिंदे यांनी पोलिस आयुक्तांना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्यातील शिंदे यांचे राजकीय वर्चस्व मोडून काढण्यासाठी विरोधकांकडून या घटनेचा वापर केला जात असल्याचा आरोपही सरनाईक यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.