सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : महापालिका शाळांची दुरवस्था, विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या आणि निधीचा अभाव यावर विरोधकांनी आवाज उठविण्यापूर्वीच आता सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनीच शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ठाणे जिल्ह्यातील महापालिका शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी सरकारकडून ठोस प्रयत्न होत नाहीत. काही शाळांमध्ये एक विद्यार्थी आणि एक शिक्षक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा शब्दांत आमदार किसन कथोरे यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्यासमोर शिक्षण व्यवस्थेचे वास्तव मांडले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरच अवलंबून न राहता शिक्षण विभागानेही स्वतंत्र निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
ठाणे जिल्ह्यातील महापालिका शाळांच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि मिरा-भाईंदर येथील महापौरांनी आपल्या शहरांतील शाळांच्या अडचणी मांडल्या. शाळांमध्ये आवश्यक सुविधा, विद्यार्थ्यांची पटसंख्या, निधी आणि शैक्षणिक गुणवत्तेचे प्रश्न ऐरणीवर आले. विशेष म्हणजे, शिक्षणमंत्र्यांसमोरच सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी शाळांच्या दुरवस्थेचा पाढा वाचल्याने शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. आमदार किसन कथोरे यांनी निधीच्या मुद्द्यावरून शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले.
जिल्हा नियोजन समितीचा निधी हा आमदार आणि महापौरांच्या माध्यमातून उपलब्ध होणारा असला, तरी शिक्षणमंत्री म्हणून आपण शाळांसाठी काय देणार, असा थेट सवाल त्यांनी केला. शाळांसाठी निधीची मागणी करणारे पत्र दिल्यानंतर ते नगरविकास विभागाकडे वर्ग केल्याचे उत्तर मिळते, मात्र शिक्षण विभागानेही स्वतःहून काहीतरी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा कथोरे यांनी व्यक्त केली. केवळ पत्रव्यवहार करून शाळांचे प्रश्न सुटणार नाहीत; प्रत्यक्ष निधी मिळाल्यासच कामे होतील, असा त्यांचा सूर होता.
‘श्रीमंतांचे शिक्षण, गरिबांचे शिक्षण’ अशी दरी
शिक्षणमंत्री भुसे यांनीही शालेय शिक्षणातील वाढत्या विषमतेकडे लक्ष वेधले. श्रीमंतांच्या मुलांना मिळणारे शिक्षण आणि गरीब विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण यांच्यातील दरी वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. ठाण्यातील महापालिका शाळा आदर्श असून, या शाळांचा आदर्श राज्यातील अन्य शाळांनी घ्यावा, असेही भुसे म्हणाले.
शिवसेनेचे आमदार, महापौरही गैरहजर
महापालिका शाळांसारख्या महत्त्वाच्या विषयावरील बैठकीला शिवसेनेचे आमदार उपस्थित नसल्याची बाब चर्चेचा विषय ठरली. ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यादेखील बैठकीला अनुपस्थित होत्या. जिल्ह्यातील अन्य महापालिकांच्या महापौरांनी शाळांच्या समस्या मांडल्या असताना ठाण्याच्या महापौरांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली. याबाबत विचारले असता, जे लोक आले नाहीत, त्यांना यावेसे वाटले नसेल, अशी प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.