कर्णबधिरांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश
भाग्यश्री वर्तक यांची ३३ वर्षांची सेवा; शिक्षणासह रोजगारातून दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वावलंबनाची दिशा
नीलेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) ः ऐकू न येणाऱ्या कानांपर्यंत शिक्षणाचा आवाज पोहोचवताना, बोलता न येणाऱ्या ओठांना अभिव्यक्तीची भाषा देताना आणि समाजाने दुर्लक्षित केलेल्या हातांना कर्तृत्वाचे बळ देताना आयुष्याची ३३ वर्षे समर्पित करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे भाग्यश्री राजेंद्र वर्तक.
शिक्षिका, पर्यवेक्षिका, मुख्याध्यापिका, मार्गदर्शक आणि सामाजिक भान जपणाऱ्या कार्यकर्त्या अशा विविध भूमिका समर्थपणे निभावणाऱ्या भाग्यश्री वर्तक म्हणजे कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने आधारवड आणि असंख्य कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत आहेत. एकेकाळी कर्णबधिर मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यांच्या क्षमतांकडे दुर्लक्ष करून त्यांना कमी लेखले जायचे. त्यांना शिकता येणार नाही, स्वतःचे विचार मांडता येणार नाहीत, सर्वसामान्यांच्या जगात आत्मविश्वासाने वावरता येणार नाही, अशी अनेकांची समजूत होती. मात्र, या समजुतींना आपल्या कार्यातून छेद देण्याचे महत्त्वपूर्ण काम भाग्यश्री वर्तक यांनी केले.
मूळच्या रत्नागिरीतील दापोली येथील भाग्यश्री वर्तक या वांद्रे येथे राहतात. मुंबईतील रोचीराम टी. थडानी हायस्कूल फॉर हिअरिंग हॅण्डिकॅप्ड या शाळेत त्यांनी तब्बल ३३ वर्षे वरिष्ठ शिक्षिका आणि पर्यवेक्षिका म्हणून काम केले. त्यानंतर शेवटची सव्वादोन वर्षे त्यांनी मुख्याध्यापिका म्हणून जबाबदारी सांभाळली. या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी केवळ अभ्यासक्रम शिकवला नाही, तर विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्याची, स्वतःचे विचार ठामपणे मांडण्याची आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद दिली.
कर्णबधिर मुलांना ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता विकसित करण्यासाठी योग्य श्रवणयंत्रे, आवश्यक वैद्यकीय उपचार, कानांवरील शस्त्रक्रिया आणि त्यानंतरची तज्ज्ञांकडून थेरपी यांचा फायदा होऊ शकतो. मात्र, श्रवणयंत्रांचा खर्च आणि उपचारांच्या मर्यादा यांमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला या सुविधा मिळतीलच असे नाही. अशा परिस्थितीत कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा विचार भाग्यश्री वर्तक यांनी केंद्रस्थानी ठेवला.
टोटल कम्युनिकेशन, सांकेतिक भाषा, मुखवाचन आणि ओष्ठवाचन अशा विविध पद्धतींचा वापर करून त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवले. सुरुवातीला अवघड वाटणारे पुस्तकातील शब्द, रटाळ वाटणारा अभ्यास आणि समजण्यास कठीण असलेली भाषा हळूहळू विद्यार्थ्यांना सोपी वाटू लागली. शिकण्याची गोडी निर्माण झाली. ज्ञानाची भीती दूर झाली आणि स्वतःच्या विचारांना शब्द, संकेत व अभिव्यक्तीचे माध्यम मिळाले.
आज कर्णबधिर विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तम प्रकारे उत्तीर्ण होऊन स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत, हे त्यांच्या कार्याचे मोठे फलित आहे. स्टार सहारा, कॅफे कॉफी डे, इशारा रेस्टॉरंट, देना बँक, नेव्ही आणि फोर सिझन्स हॉटेल यांसारख्या विविध ठिकाणी विद्यार्थी नोकरी करून सन्मानाने जीवन जगत आहेत.
‘मिरची’ आणि ‘माई माईम’ रेस्टॉरंटच्या त्या मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत होत्या. या माध्यमातून २८ कर्णबधिर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. रोजगारामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक स्वावलंबन मिळाले, तर त्यांच्या कुटुंबीयांच्या मनातही भविष्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला.
‘शुभ्रा’ प्रकल्पातून रोजगाराची नवी दारे
शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, स्वतःच्या कमाईवर जगता यावे आणि समाजात सन्मानाचे स्थान मिळावे, यासाठी त्यांनी ‘शुभ्रा’ प्रकल्पाची निर्मिती केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून रानभाज्या, राख्या, पणत्या, तोरणे, दिवाळीचा फराळ, वैशिष्ट्यपूर्ण छत्र्या आणि सीड बॉल्स अशा विविध वस्तू तयार करण्याचे उपक्रम राबवण्यात आले. सौरऊर्जेच्या सहाय्याने भाज्या व फळांच्या पावडरी तयार करण्यासारख्या उपक्रमांतूनही विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाची संधी मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.