मुंबई

अत्यावश्यक कांदळवनच हटणार!

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीसाठी कांदळवन क्षेत्रात काम करावे लागणार असले, तरी पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या परिसंस्थेला कमीत कमी धक्का लागेल, याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली. तसेच प्रकल्पासाठी केवळ अत्यावश्यक कांदळवने हटविण्याचे निर्देश देण्यात आले असून, सध्या सुमारे पाच हजार ४०० कांदळवने हटविण्याची आवश्यकता असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रक्रियेत वन विभागाच्या कांदळवन कक्षामार्फत पुनर्लागवड केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाविषयी नागरिकांच्या मनात असलेले प्रश्न, संभ्रम आणि आक्षेप यांवर चर्चा करण्यासाठी ‘रोटरी क्लब ऑफ ठाणे’च्या वतीने गुरुवारी (ता. १५) गडकरी रंगायतन येथे हर्डीकर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार व विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक हर्डीकर यांनी, कांदळवने ही केवळ झाडे नसून, स्वतंत्र आणि संवेदनशील परिसंस्था आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी ती हटविण्याचा निर्णय घेताना अनेकदा विचार करावा लागतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रकल्पाच्या कामासाठी आवश्यक तेवढ्याच कांदळवनांवर परिणाम होईल आणि शक्य तितके क्षेत्र सुरक्षित ठेवले जाईल, यावर भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

१५ ते ३५ रुपयांत रिंग मेट्रोचा प्रवास?
रिंग मेट्रोचे तिकीटदर सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले. प्राथमिक अंदाजानुसार, रिंग मेट्रोमधून १५ ते २० रुपयांत प्रवास करता येऊ शकतो, तर कमाल तिकीटदर ३० ते ३५ रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. एकापेक्षा अधिक मेट्रो मार्गिकांचा वापर केल्यास अंतर आणि मार्गानुसार तिकीटदर ६० ते ८० रुपयांपर्यंत जाऊ शकतात. हे प्राथमिक अंदाज असून अंतिम दर अद्याप निश्चित झालेले नाहीत.

राजकीय दबावाखाली मार्गरेषा बदलणार नाही
मनोरमानगर, आझादनगर आणि हिरानंदानी परिसरातील नागरिकांच्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर मार्गरेषेत बदल करण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तसेच जनहित या निकषांवरच निर्णय घेतला जाईल, असे हर्डीकर यांनी स्पष्ट केले. तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यास स्थानकांच्या नियोजनात बदल करण्याचा विचार केला जाऊ शकतो. नागरिकांशी यापुढेही संवाद सुरू ठेवला जाईल, असे त्यांनी सांगितले.

भविष्यातील गर्दीचा विचार करून सहा डबे
ठाण्याचा विस्तार आणि भविष्यातील प्रवासीसंख्या लक्षात घेऊन सहा डब्यांच्या मेट्रोचे नियोजन करण्यात आले आहे. गर्दीच्या वेळेत एका दिशेने ताशी ३० ते ३५ हजार प्रवाशांची वाहतूक करण्याची गरज गृहीत धरण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका चार, पाच आणि रिंग मेट्रो यांच्यात प्रभावी जोडणी निर्माण झाल्यास खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊ शकते.

३,२०० झाडांच्या बदल्यात ३७ हजार वृक्षलागवड
मेट्रो प्रकल्पासाठी सुमारे ३,२०० झाडे तोडण्याच्या परवानगीची प्रक्रिया करण्यात आली असून, त्याबदल्यात सुमारे ३७ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, वृक्षलागवड केवळ कागदावर न राहता लावलेली झाडे जगली आहेत का, यावरही देखरेख ठेवली जाईल, असे त्यांनी सांगितले.

सुरक्षितता आणि पर्यावरणाला प्राधान्य
प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले, तरी सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही. बांधकामापूर्वी बॅरिकेडिंग, वाहतूक वळविण्याचे नियोजन आणि वाहतूक पोलिसांशी समन्वय साधला जाईल. चालकविरहित स्वयंचलित प्रणालीचाही विचार सुरू असून, सुरक्षिततेसाठी नियंत्रण कक्ष आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असेल. भूमिगत मेट्रोच्या कामापूर्वी परिसरातील इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांच्या भिंतींवरील विद्यमान भेगांची नोंद घेतली जाते. कामानंतर त्यात काही बदल झाला आहे का, याची तपासणी करता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: शहरात १०% पाणीकपात, तरीही टँकरने धुतले BRT चे डिव्हायडर; नागरिकांमधून संताप

SCROLL FOR NEXT