जीटी रुग्णालयाच्या नर्सिंग संस्थेत बी.एस्सी.च्या १०० जागा
संस्थेचे पदवी महाविद्यालयात श्रेणीवर्धन
सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १९ : मुंबईतील गोकुळदास तेजपाल (जीटी) रुग्णालयाच्या शासकीय नर्सिंग प्रशिक्षण संस्थेचे आता बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयात श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. त्यामुळे नर्सिंगचे पदवी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय स्तरावर आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (एमयूएचएस) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी संस्थेला संलग्नता दिली असून, बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमासाठी वार्षिक १०० जागांची प्रवेशक्षमता मंजूर केली आहे.
आतापर्यंत या संस्थेत जीएनएम अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जात होते. आता पदवी महाविद्यालयाचा दर्जा मिळाल्याने नर्सिंग शिक्षणाच्या कक्षा विस्तारण्यास मदत होणार आहे. विशेषतः मुंबईतील शासकीय संस्थेतून बी.एस्सी. नर्सिंगचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे पर्याय उपलब्ध होऊ शकतो. आरोग्यसेवा क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लक्षात घेता, या श्रेणीवर्धनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
विद्यापीठाची संलग्नता आणि १०० जागांची प्रवेशक्षमता मंजूर झाली असली, तरी प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यासाठी संबंधित नियामक संस्थांच्या आवश्यक परवानग्या आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश सुरू होणार का, प्रवेशाचे निकष काय असतील आणि विद्यार्थ्यांना अर्ज कधी करता येईल, याबाबत अधिकृत प्रवेशसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्टता येणार आहे.लोकमान्य टिळक मार्ग, धोबीतलाव येथील या संस्थेला बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमासाठी भारतीय नर्सिंग कौन्सिल, राज्य शासन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ तसेच प्रवेश व शुल्क नियमनाशी संबंधित प्राधिकरणांच्या लागू नियमांचे पालन करावे लागणार आहे.
नर्सिंग क्षेत्रातील पदाधिकारी डॉ. जितेंद्र सकपाळ म्हणाले, “जीएनएम प्रशिक्षण संस्थेचे बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयात श्रेणीवर्धन होणे ही चांगली बाब आहे. यासाठी आम्ही प्रयत्न केले असून, पुढील आवश्यक प्रक्रिया आणि अर्जांबाबतही पाठपुरावा सुरू आहे. शासनाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे नर्सिंगचे पदवी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिक संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.”