ठाणेकरांशी संवाद साधायला हवा होता!
रिंग मेट्रोच्या नियोजनाबाबत श्रावण हर्डीकर यांची कबुली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : ठाणे रिंग मेट्रो नियोजनाच्या टप्प्यातच नागरिकांशी संवाद साधायला हवा होता, अशी कबुली महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली. नागरिकांच्या मनातील शंका आणि आक्षेप समजून घेण्यात संवादाची भूमिका महत्त्वाची असल्याचे मान्य करीत त्यांनी याबाबत दिलगिरीही व्यक्त केली.
ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाविषयी नागरिकांच्या मनातील प्रश्न, संभ्रम आणि आक्षेपांवर चर्चा करण्यासाठी ‘रोटरी क्लब ऑफ ठाणे’च्या वतीने गुरुवारी (ता. १५) गडकरी रंगायतन येथे हर्डीकर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ पत्रकार व विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. नागपूर आणि पुणे येथील मेट्रो प्रकल्पांचा अनुभव असल्याने ठाणेकरांना मेट्रोचे महत्त्व समजेल, असा आपला समज होता. मात्र, ठाण्यातील नागरिकांशी सुरुवातीलाच संवाद साधणे आवश्यक होते, असे हर्डीकर यांनी मान्य केले. मेट्रोचे तिकीटदर सर्वसामान्यांना परवडणारे ठेवण्याचा प्रयत्न असून, ठाणेकरांची साथ मिळाल्यास प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करता येईल. मेट्रोच्या मार्गरेषेत बदल करताना राजकीय सोयीपेक्षा तांत्रिक व्यवहार्यता, आर्थिक गणित आणि जनहिताला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मेट्रो चार आणि पाचच्या कामाला १० वर्षे होऊनही त्या सुरू झाल्या नसल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. या मार्गिका आपल्या अखत्यारीत नसल्याने त्यांच्या विलंबाची निश्चित कारणे किंवा त्या सुरू होण्याची तारीख सांगता येणार नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
सप्टेंबर २०२९ च्या मुदतीबाबत प्रश्नचिन्ह
रिंग मेट्रो सप्टेंबर २०२९ पर्यंत सुरू करण्याची तारीख जाहीर करता येईल का, असा प्रश्न या वेळी उपस्थित करण्यात आला. यावर प्रकल्पासाठी आवश्यक जागा आणि कामाची प्रवेशस्थळे पालिकेकडून उपलब्ध होणे महत्त्वाचे असल्याचे हर्डीकर यांनी स्पष्ट केले. नागरिकांना प्रकल्पासंदर्भातील प्रश्नांसाठी महामेट्रोच्या ठाणे कार्यालयात वरिष्ठ अभियंता सुरेश पाखरे यांची सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत भेट घेता येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.