पुलाला ‘नाना पाटेकर सेतू’ नाव देण्याची मागणी
विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्याकडून महापौरांना निवेदन
घाटकोपर, ता. १५ : विद्याविहार येथील एम. जी. रोडवर नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाला ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री नाना पाटेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ईशान्य मुंबई विभाग क्रमांक ८ च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात विभागप्रमुख सुरेश पाटील यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना निवेदन सादर केले.
नाना पाटेकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनय क्षेत्रातील योगदानाबरोबरच ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी आणि गरजू नागरिकांना मदत करण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कलात्मक योगदानासह सामाजिक बांधिलकीचा गौरव व्हावा, या उद्देशाने पुलाला त्यांचे नाव देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या आणि सामाजिक कार्यातून जनसामान्यांशी नाते जोडणाऱ्या नाना पाटेकर यांच्या नावाने पुलाचे नामकरण झाल्यास त्यांच्या कार्याचा सन्मान होईल, अशी भूमिका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
या वेळी प्रभाग क्रमांक १२३ चे नगरसेवक व बेस्ट समितीचे सदस्य सुनील मोरे, प्रभाग क्रमांक १२७ च्या नगरसेविका व आरोग्य समितीच्या सदस्या स्वरूपा पाटील, विभाग समन्वयक इम्रान शेख, विधानसभा कार्यालयप्रमुख प्रकाश वाणी आणि शाखाप्रमुख अजय मंडलिक यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.