ठाण्यात १२ टनांचा लोखंडी सांगाडा झुकला
कारचे नुकसान; एमएमआरडीएकडून कंत्राटदारावर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : पूर्व द्रुतगती महामार्गावरील भास्कर कॉलनी परिसरात उड्डाणपुलाच्या खांबासाठी उभारण्यात येणारा १२ टन वजनाचा लोखंडी सळ्यांचा सांगाडा (रिइन्फोर्समेंट केज) शनिवारी (ता. १७) रस्त्याच्या दिशेने झुकला. या घटनेत एका कारचे नुकसान झाले असून, कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेची गंभीर दखल घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) संबंधित कंत्राटदाराला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून, सुरक्षेतील त्रुटींच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ शनिवारी दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एमएमआरडीएच्या माध्यमातून आनंदनगर ते साकेत उन्नत मार्गाचे काम सुरू आहे. या प्रकल्पातील खांबाच्या उभारणीसाठी वापरण्यात येणारा लोखंडी सांगाडा अचानक महामार्गाच्या दिशेने झुकला. त्या वेळी तेथून जाणाऱ्या एका कारचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस, नौपाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक आणि संबंधित कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने झुकलेला सांगाडा बाजूला करण्यात आला. खासदार नरेश म्हस्के, शहर वाहतूक पोलिस उपायुक्त शिरसाठ यांच्यासह संबंधित अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. कामात सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असून, नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडे केली आहे.
.....
कंत्राटदाराला दोन कोटींचा दंड
मुंबई : बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षेतील त्रुटींमुळे होणारे अपघात स्वीकारार्ह नसल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर संबंधित कंत्राटदाराला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सुरक्षेतील त्रुटींचा शोध घेण्यासाठी चौकशी केली जाणार असून, सुरक्षा नियमांच्या पालनात निष्काळजी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही प्राधिकरणाने दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक सुधारात्मक उपाययोजना केल्या जातील, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.