पनवेलला वाहतूक कोंडीतून दिलासा
‘रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत सहा प्रकल्पांचा प्रस्ताव; एल अँड टी वसाहतीत सातव्या क्रॉसिंग ब्रिजची मागणी
पनवेल, ता. १८ (बातमीदार) : रेल्वे फाटकांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी पनवेल महापालिका क्षेत्रात दोन भुयारी मार्ग आणि चार उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला आहे. राज्य शासनाच्या ‘रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत हे प्रकल्प प्रस्तावित असून, फेज टू एल अँड टी नवीन वसाहत परिसरात सातवा क्रॉसिंग ब्रिज उभारण्याची मागणी अरविंद म्हात्रे यांनी केली आहे.
नागरिकांची सुरक्षितता वाढवणे, रेल्वेरूळ ओलांडताना होणारे अपघात टाळणे आणि शहरातील वाहतूक सुरळीत करणे हा या प्रकल्पांचा मुख्य उद्देश आहे. ८ जून २०२६ रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील १३१ ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती. महारेलच्या सर्वेक्षणात रेल्वे फाटक नसतानाही रेल्वेमुळे रस्ते बंद होऊन वाहतुकीला अडथळे निर्माण होणारी ८० ठिकाणे आढळली. त्यापैकी चार ठिकाणे पनवेलमधील आहेत.
महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी यासंदर्भातील प्रस्ताव महासभेपुढे सादर केला आहे. या प्रकल्पांचा संपूर्ण खर्च महारेल करणार असून, महापालिकेकडून आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जोडरस्ते आणि नाल्यांची कामेही महारेल करणार आहे. कामापूर्वी संयुक्त पाहणी, रस्त्यांची नियोजित रुंदी, वीज-पाणी वाहिन्या आणि सिडकोशी समन्वय साधण्याबाबत अटी निश्चित करण्यात येणार आहेत.
फेज टू एल अँड टी नवीन वसाहत परिसरात रेल्वे क्रॉसिंग ब्रिज उभारण्याची मागणी अरविंद म्हात्रे यांनी केली. प्रस्तावित सहा प्रकल्पांव्यतिरिक्त या ठिकाणीही पूल उभारल्यास नागरिकांच्या रेल्वे मार्गावरील ये-जा अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास मदत होईल, असा मुद्दा त्यांनी महासभेत मांडला.
सहा ठिकाणांचा आराखडा
कळंबोली ते पनवेल स्थानकादरम्यान मुंबई-सातारा महामार्गावर आणि खारघर स्थानक परिसरात भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत. खांदा कॉलनीतील सीकेटी कॉलेज ते जव्हार इंडस्ट्रीज, अडीवली येथे एनएच-४ ते तुर्भे व ग्रीन डेटा सेंटरला जोडणारा रस्ता, रोहिंजण येथे एनएच-४ ते नागझरी व तळोजा एमआयडीसी ग्रीन डेटा सेंटरला जोडणारा रस्ता, तसेच काळूंद्रे येथून टीपीएस क्रमांक ५ आणि ७ ला जोडणाऱ्या मार्गावर उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. या कामांमुळे संबंधित परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.