रायगडमध्ये आरोग्यसेवेचा आढावा
दीर्घकाळ रुग्णसेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांचा गौरव; आरोग्य सुविधा बळकट करण्यावर भर
अलिबाग, ता. १८ (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी ३० ते ४० वर्षे निःस्वार्थ भावनेने रुग्णसेवा देणाऱ्या चार खासगी डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. तसेच आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १६) ही बैठक झाली. या वेळी जिल्हा परिषद सदस्या दिशा जाधव, खालापूर पंचायत समिती सभापती कृष्णा पारंगे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयेश गोसावी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत १,२७४ शिबिरे घेण्यात आली, तर सेवा संकल्प अभियानातून १,४०० जन्म-मृत्यू दाखले निकाली काढण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ग्रामीण आरोग्य केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी सूचना कृष्णा पारंगे यांनी केली.
२७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा कार्यक्रम आणि ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप राउंड राबविण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात वातानुकूलित कक्ष निर्माण करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
चार डॉक्टरांचा गौरव
जिल्ह्यात दीर्घकाळ रुग्णसेवा देणाऱ्या पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील डॉ. संदेश बहाडकर, साई येथील डॉ. हरिश्चंद्र भोईर, माणगाव येथील डॉ. एम. जी. मुल्ला आणि महाड तालुक्यातील दासगाव येथील डॉ. मोहन मेथा यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषदेने आपल्या सेवेची दखल घेतल्याबद्दल सत्कारमूर्ती डॉक्टरांनी प्रशासनाचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.