जुनी पेन्शन, ५० हजार बोनससाठी महापालिका कर्मचारी आक्रमक
मुलुंड, ता. १९ (बातमीदार) : जुनी पेन्शन योजना लागू करावी, राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना (एनपीएस) अंतर्गत वळविण्याच्या प्रस्तावित ६,२०० कोटी रुपयांच्या निधीला स्थगिती द्यावी आणि दिवाळीपूर्वी ५० हजार रुपयांचा बोनस मंजूर करावा, या मागण्यांसाठी मुंबई महापालिकेतील कामगार, कर्मचारी आणि अधिकारी आंदोलन करणार आहेत. मुंबई महापालिका कामगार-कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. २३) सकाळी १० वाजल्यापासून महापालिका मुख्यालयात हे आंदोलन करण्यात येणार आहे. महापालिकेतील सर्व कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी राखीव असलेला सुमारे ६,२०० कोटी रुपयांचा निधी अन्य योजनेकडे वळवू नये, अशी भूमिका समन्वय समितीने घेतली आहे. तसेच, २३ ऑक्टोबरला महापालिका सभागृहात सादर होणारा एनपीएससंदर्भातील ठराव रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या धर्तीवर स्वतंत्र पेन्शन धोरण तयार करावे, अशी मागणी संघटनांनी केली आहे. हे धोरण निश्चित करण्यापूर्वी कामगार संघटनांशी चर्चा करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपयांचा बोनस देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.