दुष्काळग्रस्तांना हक्काची मदत द्या
नुकसानीच्या प्रमाणात भरपाई देण्याची शेकापची मागणी
अलिबाग, ता. १९ (वार्ताहर) : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली अवघे पाच हजार रुपये देण्याच्या सरकारच्या भूमिकेवर शेतकरी कामगार पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम देण्याऐवजी त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात हक्काची आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी शेकापच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली.
दुष्काळाचे संकट गडद होत असताना पिकांचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च, कर्जाचा बोजा आणि महागाई यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दिवाळी तोंडावर असताना कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण आणि पुढील हंगामासाठी शेतीची तयारी कशी करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांची मदत जाहीर करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे पाटील यांनी म्हटले.
सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर करण्याबाबत ठोस भूमिका घ्यावी. मदतीसाठीचे निकष, पात्र शेतकरी आणि त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची तारीख याबाबत स्पष्ट माहिती द्यावी. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
पाच हजारांत प्रश्न सुटणार का?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान, उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पाच हजार रुपयांत कसा सुटणार, असा सवाल शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी उपस्थित केला. मदतीच्या नावाखाली तुटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करणे थांबवावे आणि त्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.