वारस नोंदीतील त्रुटींविरोधात शेकाप आक्रमक
देहरंग मालमत्ता प्रकरणाच्या चौकशीची मागणी; तलाठी वल्लभ मसके यांच्या निलंबनासाठी निवेदन
पनवेल, ता. १९ (बातमीदार) : पनवेल तालुक्यातील देहरंग येथील मालमत्तेच्या वारस नोंदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत शेतकरी कामगार पक्षाच्या शेतकरी महासभेचे रायगड जिल्हाध्यक्ष अनिल ढवळे यांनी १६ ऑक्टोबर रोजी अपर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देणे आणि लाच मागितल्यामुळे नोंदीस विलंब झाल्याचे आरोप करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तलाठी वल्लभ मसके यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
मुधा सातारकर यांनी २२ सप्टेंबर २०२५ रोजी वारस नोंदीसाठी अर्ज केला होता. या अर्जासोबत वारसांची नावे, आधार कार्ड, सातबारा आणि फेरफार नोंदी यांसारखी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली होती का, याची योग्य पडताळणी झाली नसल्याचा दावा ढवळे यांनी केला. संबंधित वारस पुण्यात वास्तव्यास असतानाही पुणे जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांमार्फत आवश्यक पडताळणी करण्यात आली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
या मालमत्तेशी संबंधित इरीन मेरी अल्बर्ट फ्रॉन्सीका यांनी २३ एप्रिल २००८ रोजी पुण्यात इच्छापत्राची नोंदणी केली होती. या इच्छापत्रात विविध मालमत्ता आणि आठ अपत्यांचा उल्लेख असून, अल्फ्रेया डायस व टेरेन्स फ्रॉन्सीका यांना कार्यकारी विश्वस्त म्हणून अधिकार दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, देहरंग येथील सर्व्हे क्रमांक १८/२३ चा स्पष्ट उल्लेख इच्छापत्रात नसल्याचा दावा ढवळे यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, २४ नोव्हेंबर १९९५ रोजी संबंधित मालमत्तेचा १,२०० रुपयांत खरेदीव्यवहार झाला होता. या प्रकरणात फेरफार क्रमांक २०७, मृत्यूचे दाखले, खरेदीखत आणि सातबारा यांसह विविध कागदपत्रांचा संदर्भ देण्यात आला आहे. वारसनोंदीची संपूर्ण प्रक्रिया तपासून संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मूळ वारसांना डावलल्याचा आरोप
लाच मागितल्यामुळे मूळ वारसांना नोंदीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रांची सत्यता, वारस नोंदीची प्रक्रिया आणि महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीची सखोल चौकशी करण्याची मागणी शेकापकडून करण्यात आली आहे. तलाठी वल्लभ मसके यांच्या निलंबनाची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.