मुंबई

गर्भावस्थेतच निदान; २० दिवसांच्या उपचारानंतर बाळ सुखरुप घरी

CD

हृदय, यकृत, आतडी शरीराबाहेर; नवजात बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया
गर्भावस्थेतच निदान; २० दिवसांच्या उपचारानंतर बाळ सुखरूप घरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : हृदय, छाती आणि पोटाच्या रचनेत गंभीर दोष असलेल्या नवजात बाई जेरबाई वाडिया रुग्णालयात बालिकेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ‘कॅन्ट्रेल्स पेंटॅलॉजी’ या अत्यंत दुर्मिळ जन्मजात विकारामुळे बालिकेचे हृदय, यकृताचा मोठा भाग आणि आतड्यांचे काही भाग शरीराच्या बाहेर आले होते. गर्भावस्थेतच या विकाराचे निदान झाल्याने प्रसूतीपूर्व नियोजन करून शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. उपचारानंतर २० दिवसांनी बालिकेला घरी सोडण्यात आले.

‘कॅन्ट्रेल्स पेंटॅलॉजी’ हा अत्यंत दुर्मिळ विकार असून, सुमारे ६५ हजार ते दोन लाख जन्मांमागे एका बाळामध्ये तो आढळतो. या विकारात पोटाची भिंत, छातीचे हाड, श्वसनपटल, हृदयाभोवतालचे आवरण आणि हृदयाच्या रचनेत विविध दोष निर्माण होतात. गंभीर प्रकारात हृदयाचा काही भाग किंवा संपूर्ण हृदय छातीबाहेर असू शकते.

या बालिकेचे निदान गर्भावस्थेतच झाले होते. त्यामुळे प्रसूतीतज्ज्ञ, बालशल्यचिकित्सक, हृदयरोगतज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञांनी उपचारांचे नियोजन केले. १७ जून २०२६ रोजी सिझेरियनद्वारे प्रसूती झाली. जन्मानंतर श्वसनास मदत मिळावी यासाठी बालिकेला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले.

तपासणीत छाती आणि पोटाच्या वरच्या भागातील भिंतीत गंभीर दोष असल्याचे आढळले. हृदयाचा डावा भाग, यकृताचा मोठा भाग आणि आतड्यांचे काही भाग शरीराबाहेर आले होते. याशिवाय छातीचे हाड, श्वसनपटल आणि हृदयाभोवतालच्या आवरणातही दोष होता. हृदयातील दोन खालच्या कप्प्यांमधील पडद्यात छिद्र (व्हीएसडी) आणि जन्मानंतर बंद होणारी रक्तवाहिनी खुली राहण्याची समस्या (पीडीए) होती.

शस्त्रक्रियेत बाहेर आलेले हृदय, यकृत आणि आतड्यांचे भाग काळजीपूर्वक त्यांच्या योग्य जागी ठेवण्यात आले. हृदयाभोवतालचे आवरण पुन्हा तयार करण्यासाठी बालिकेच्याच शरीरातील ऊतींचा वापर करण्यात आला, तर काही भागासाठी कृत्रिम जाळीचा आधार घेण्यात आला. त्यानंतर श्वसनपटल आणि पोटाच्या भिंतीची पुनर्रचना करण्यात आली.

अवयव पुन्हा छाती व पोटात ठेवल्यानंतर आतील दाब वाढण्याचा आणि त्याचा हृदय व फुप्फुसांवर परिणाम होण्याचा धोका होता. त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान बालिकेची प्रकृती स्थिर ठेवणे हे मोठे आव्हान होते. बालशल्यचिकित्सक डॉ. प्रज्ञा बेंद्रे, डॉ. गायत्री मुंघाटे, डॉ. अभिषेक माथुर आणि हृदय व छातीचे शल्यचिकित्सक डॉ. बिस्वा पांडा यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. भूलतज्ज्ञांच्या पथकानेही शस्त्रक्रियेदरम्यान बालिकेच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले.

शस्त्रक्रियेनंतर बालिकेला नवजात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. तिची प्रकृती सुधारल्यानंतर कृत्रिम श्वसनयंत्रणेचा आणि औषधांचा आधार हळूहळू कमी करण्यात आला. तिने स्तनपान सुरू केले. पुढील तपासण्यांमध्ये आतड्यांचे आणि मूत्रविसर्जनाचे कार्य सुरळीत असल्याचे आढळले. शस्त्रक्रियेची जखमही व्यवस्थित भरून आल्यानंतर २० व्या दिवशी तिला घरी सोडण्यात आले.

अशा दुर्मिळ जन्मजात विकारांमध्ये गर्भावस्थेत निदान, प्रसूतीपूर्व नियोजन, जन्मानंतर तातडीची विशेष काळजी आणि अनेक वैद्यकीय विभागांमधील समन्वय उपचारासाठी महत्त्वाचा ठरतो. या प्रकरणात जन्मानंतर लगेच उपचार सुरू करता आल्याने शस्त्रक्रियेपूर्वीची आणि शस्त्रक्रियेनंतरची जोखीम हाताळणे शक्य झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Bhagwangad News : भगवानगडाच्या चतुर्थ महंतपदी कृष्णा महाराज शास्त्री विराजमान होणार; दुष्काळामुळे सोहळा साधेपणाने

Law Courses : विधी अभ्यासक्रमाला मुलींची पसंती; प्रवेशाचे प्रमाण ४३.३८ टक्क्यांवर

IND vs NZ, Schedule: भारताचा T20 संघ न्यूझीलंडला पोहोचला! वैभव सूर्यवंशीसोबत फॅन्सने घेतले सेल्फी, भुवीही कमबॅकसाठी सज्ज

Latest Marathi News Live Update : गोकुळचा निकाल आता फेरमतमोजणीच्या फेऱ्यात, जल्लोषानंतर आकडे बदलले; लेटेस्ट अपडेट वाचा

SCROLL FOR NEXT