पाणीटंचाईवरील तोडग्यासाठी
२०२९ उजाडणार ः गणेश नाईक
कर्जत तालुक्यात दोन धरणांची उभारणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याची मागणी आणि उपलब्ध पुरवठा यांच्यातील अंतर वाढत आहे. ठाण्यासह सहा शहरांसाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात दोन धरणे उभारली जात आहेत. पोशीर आणि शिलार या धरणांमधून एकूण दोन हजार दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणी उपलब्ध होणार असून, २०२९ पर्यंत अतिरिक्त जलस्रोत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आणि पनवेलच्या पाणीपुरवठ्याला भविष्यात आधार मिळण्याची अपेक्षा वनमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी (ता. १९) व्यक्त केली आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील शहरांचा विस्तार वेगाने होत असताना पाण्याची उपलब्धता महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. ठाणे शहरालाही याची झळ बसत असून, दररोजच्या गरजेइतका पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. शहराची लोकसंख्या सुमारे २७ लाखांवर पोहोचली असून, नव्या गृहसंकुलांमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. सध्या ठाण्याला दररोज ६२१ एमएलडी पाण्याची गरज असताना सुमारे ५९० एमएलडी पाणी मिळते. परिणामी, दररोज ३१ एमएलडीची तूट निर्माण होत आहे.
………………
नव्या जलस्रोतांकडे लक्ष
ठाण्याला स्वतंत्र धरण नसल्याने विविध स्रोतांमधून पाणी मिळवावे लागते. घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणीपुरवठ्याच्या अडचणी जाणवत असताना नव्या धरणांमुळे भविष्यातील गरज भागविण्यास मदत होऊ शकते. पोशीर आणि शिलार धरणांतून प्रत्येकी एक हजार एमएलडी पाणी उपलब्ध होण्याचे नियोजन आहे. यातील ५०० एमएलडी पाणी नवी मुंबईला देण्याची योजना असून, उर्वरित पाण्याचे वितरण ठाण्यासह अन्य शहरांसाठी प्रस्तावित आहे.
-----------------
तीन वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षा
मे किंवा डिसेंबर २०२९ पर्यंत या प्रकल्पांमधून संबंधित शहरांना पाणी उपलब्ध होण्याची शक्यता गणेश नाईक यांनी व्यक्त केली, मात्र धरणांचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत शहरांमधील पाण्याची वाढती गरज भागविण्याचे आव्हान कायम राहणार आहे. त्यामुळे दीर्घकालीन जलनियोजनासोबतच सध्याच्या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.