शेतकऱ्यांच्या घरी मदतीचे तोरण बांधा!
मुंबईत न येणाऱ्या शिवसैनिकांना आवाहन
मुंबई, ता. १९ : राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे मंगळवारी (ता. २०) संध्याकाळी पाच वाजता दसरा मेळाव्याला मुंबई आणि परिसरातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे. दुष्काळग्रस्त भागातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी मुंबईत येण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन मदतीचे तोरण लावावे, असे आवाहन पक्षाने केले आहे.
यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी शिवसेना नेत्यांच्या भाषणाने थेट मेळाव्याला सुरुवात होईल. दरवर्षी दसरा मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मोठ्या संख्येने मुंबईत येतात; मात्र यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता मुंबईत येण्याऐवजी दुष्काळग्रस्त भागातील शिवसैनिकांनी संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या दारी मदतीचे तोरण लावावे. दसरा मेळाव्यासाठी मुंबई आणि परिसरातील शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाने केले आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत असून, दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठीही शिवसेनेच्या वतीने मदत करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांसाठी मदत निधीचे धनादेश उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले.
---
दुष्काळग्रस्तांसाठी आनंदाचा शिधा
दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असून, शेतकरी कुटुंबांना या कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे ट्रक राज्यातील विविध भागांमध्ये रवाना केले जाणार आहेत.