नगरसेवक सागर नाईक
यांचे पद रद्द करण्याची मागणी
नगरविकास विभाग, निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २० : नवी मुंबई पालिका क्षेत्रातील सारसोळे गाव येथे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाईदरम्यान बेलापूर न्यायालयाची बनावट स्टे ऑर्डर दाखवून पालिकेच्या कार्यवाहीत अडथळा निर्माण केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला. याप्रकरणी नगरसेवक सागर नाईक यांची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मिरजे यांनी नगरविकास आणि निवडणूक आयोगाकडे केली आहे. दरम्यान, नगरविकास विभाग, निवडणूक आयोगाकडून याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
बेकायदा बांधकामाला संरक्षण देत प्रशासनाची दिशाभूल केल्याची तक्रार मिरजे यांनी प्रशासनाकडे केली.
या फसवणुकीप्रकरणी मिरजे यांनी ३ ऑगस्ट, ६ ऑगस्ट २०२६ रोजी नगरविकास विभाग व राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली. नाईक यांनी नगरसेवक पदाच्या अधिकाराचा दुरुपयोग करत न्यायालयाच्या नावे बनावट दस्तऐवज सादर केल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी मिरजे यांनी निवेदनात केली.
याबाबत नगरविकास विभागाचे अप्पर सचिव डॉ. रवींद्र भराटे यांनी नवी मुंबई पालिका आयुक्तांना पत्र पाठवून, याप्रकरणी मिरजे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा सविस्तर व वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश दिले. राज्य निवडणूक आयोगाचे तहसीलदार किशोर साळवे यांनी ६ ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या निवेदनावर आवश्यक कार्यवाहीसाठी हे प्रकरण नगर विकास विभागाच्या उप सचिवांकडे वर्ग केले आहे. तसेच, या पत्राची प्रत नवी मुंबई महापालिका आयुक्त यांनाही पाठवण्यात आली आहे.
-----------------------------------
प्रकरण काय?
पालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या नेरूळ येथील सारसोळे गावातील सर्व्हे नंबर ९१/९२ वर एका अनधिकृत बांधकामावर पालिकेचे पथक कारवाई (निष्कासन मोहीम) करण्यासाठी गेले होते. त्या वेळी नाईक यांनी बांधकामावर बेलापूर न्यायालयाचा स्थगिती आदेश (स्टे ऑर्डर) असल्याचे सांगून तो आयुक्तांना पाठवला आणि कारवाई थांबवण्यास सांगितले. परंतु, पालिकेच्या विधीविभागाने या स्टे ऑर्डरची सखोल शहानिशा केल्यानंतर स्थगिती आदेश बनावट असल्याचे तसेच, त्यावर न्यायाधीशांची बनावट स्वाक्षरी असल्याचे निष्पन्न झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.