मिनी चौपाटीवरील सुरक्षा धोक्यात
सीसीटीव्ही, प्रकाशयोजना आणि स्वच्छतेसाठी नागरिकांचा आग्रह
नेरूळ, ता. २१ (बातमीदार) : वाशीतील मिनी चौपाटीवर सकाळी आणि संध्याकाळी नागरिकांची मोठी गर्दी असते, मात्र दोन महिन्यांपूर्वी १८ वर्षीय सुजन कुमार महातो याची येथे हत्या झाल्यानंतर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेनंतर वाढविण्यात आलेली पोलिसांची गस्त काही काळापासून कमी झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे कायमस्वरूपी पोलीस चौकी, सीसीटीव्ही यंत्रणा आणि पुरेशा प्रकाशव्यवस्थेसह उद्यानातील स्वच्छता राखण्याची मागणी होत आहे.
हत्येच्या घटनेनंतर नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवून पोलिस आणि महापालिकेकडे निवेदन दिले होते. त्यानंतर पोलिसांची गस्त वाढविण्यात आली, तसेच धोकादायक पद्धतीने दुचाकी चालविणाऱ्यांवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र या उपाययोजना नियमितपणे सुरू नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
मिनी चौपाटी परिसरात अनेक शाळा आणि महाविद्यालये असल्याने दिवसा तसेच संध्याकाळी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. प्रेमी युगुलांचाही येथे वावर असतो. अशा वेळी काही समाजकंटकांकडून छेडछाडीचे प्रकार घडण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी नियमित पोलिस गस्त घालावी, कायमस्वरूपी पोलिस चौकी सुरू करून पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत, तसेच संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी होत आहे.
जलसाठ्याच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्या
सुरक्षेबरोबरच उद्यानातील स्वच्छता आणि सुविधांच्या देखभालीचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. काही महिन्यांपूर्वी परिसरातील जलसाठ्यात मासे मृतावस्थेत आढळले होते. त्यानंतर महापालिकेने स्वच्छता मोहीम राबवून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते, मात्र जलसाठ्याची नियमित स्वच्छता, पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी आणि पर्यावरणीय स्थितीवर देखरेख ठेवणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसह उद्यानाचा परिसर स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी महापालिका व पोलिसांनी समन्वयाने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.