मुंबई, ता. २२ : समाजातील वंचित, गरजू, कष्टकरी, महिला तसेच आदिवासी बांधवांना कायद्याची माहिती मिळावी आणि त्यांच्या समस्यांवर योग्य कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने डी. टी. एस. एस. लॉ कॉलेजच्या विधी शाखेतील विद्यार्थ्यांनी कांदिवली व मालाड परिसरात मोफत कायदेशीर मार्गदर्शनाचा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून दर रविवारी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून विविध सामाजिक व कायदेशीर प्रश्नांवर नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे.
महाविद्यालयाचे मंगेश बोबडे, विशाल पगारे, नदीम खान, मुझम्मील शेख, वाजिद सिद्दीकी, प्रवीण ठाकूर, संदीप निकुंभ आणि त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.
महिला अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, ग्राहकांच्या तक्रारी, मालमत्तेचे वाद, रोजगारविषयक समस्या, कामगार कायदे, ॲट्रॉसिटी कायदा, पोलिस प्रशासन तसेच शासकीय योजनांविषयी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुलेनगर आणि कांदिवली परिसरातील आदिवासी पाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आप्पा पाड्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यावर विधी पथकाने विशेष भर दिला आहे. या भागांमध्ये आर्थिक परिस्थिती, शैक्षणिक संधींचा अभाव, रोजगाराच्या समस्या आणि शासकीय योजनांविषयी अपुरी माहिती असल्याचे विद्यार्थ्यांच्या पाहणीतून समोर आले. याशिवाय पाणी, वीज आणि आरोग्यविषयक सुविधांशी संबंधित प्रश्नही नागरिकांनी मांडले.
मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर
वन विभागाच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या काही नागरिकांनी मूलभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न विधी पथकासमोर मांडला. पाणी, वीज आणि इतर आवश्यक सुविधांबाबत अडचणी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या समस्यांचा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत असलेल्या जीवनाच्या अधिकाराशी संबंध असल्याचा मुद्दाही पथकाने अभ्यासासाठी घेतला आहे.
कायदेविषयक जनजागृतीला चालना
डी. टी. एस. एस. लॉ कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. एस. कुऱ्हाडे, प्रभारी प्राचार्य डॉ. रीटा बन्सल आणि महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी समीर फनाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कायद्याची माहिती केवळ न्यायालयीन प्रक्रियेपुरती मर्यादित न राहता ती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी, तसेच वंचित नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यांना योग्य कायदेशीर मार्गदर्शन देण्याच्या या प्रयत्नामुळे कांदिवली व मालाड परिसरात विधी साक्षरता आणि सामाजिक जनजागृतीला चालना मिळत आहे.
मुंबई : डी. टी. एस. एस. लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून नागरिकांना कायद्याचे मोफत मार्गदर्शन केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.