सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच दिवाळीचा शिधाही थेट घरापर्यंत पोहोचवणाऱ्या उपक्रमाची सुरुवात ठाण्यातून झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्याचे शेकडो ट्रक दुष्काळग्रस्त भागात पाठविण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप बंगल्यातून या मदत साहित्याच्या ट्रकना भगवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.
दुष्काळग्रस्त भागात मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी, आमदार आणि खासदारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, शेतकऱ्यांना मदत देताना सरकार हात आखडता घेणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची मदत जमा केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. सरकारी मदत खात्यात तर शिवसेनेची मदत शेतकऱ्यांच्या घरात पोहोचवण्यात येत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतजमिनी खरडून गेल्या. गुरेढोरे आणि उभी पिके वाहून गेली. यंदा दुष्काळामुळे पिके करपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि मुलींच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या अडचणींची सरकारला जाणीव असून शेतकऱ्यांना पूर्ण मदत केली जाईल. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीही शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शिवसेनेच्या माध्यमातून पाठविण्यात येणारा दिवाळीचा शिधा कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर, घरात आणि दारापर्यंत पोहोचविणार आहेत. दसरा मेळाव्यातूनही मदत साहित्याचे ट्रक रवाना केले जाणार आहेत.
या वेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना सचिव राम रेपाळे, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, राज्य संघटन प्रमुख आनंद परांजपे, प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मुलींच्या लग्नाचा जबाबदारी उचलणार
दुष्काळामुळे ज्या शेतकरी कुटुंबांतील मुलींच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यांच्या लग्नाची जबाबदारी शिवसेना उचलणार आहे. अशा कुटुंबांची नोंद घेण्याच्या सूचना आमदार, जिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुखांना देण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.