कांगोरीगडावर दुर्गसंवर्धनाचा जागर
ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मावळा प्रतिष्ठानचा पुढाकार
पोलादपूर, ता. २१ (बातमीदार) : ‘आधी तोरण गडाला, मग माझ्या घराला’ या आवाहनाला प्रतिसाद देत महाड-पोलादपूर तालुक्यांच्या सीमेवरील किल्ले कांगोरीगडावर विजयादशमी उत्साहात साजरी करण्यात आली. मावळा प्रतिष्ठान, पोलादपूरच्या वतीने गडपूजनासह आगामी स्वच्छता आणि दुर्गसंवर्धन मोहिमांचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमातून ऐतिहासिक वारसा जतन करण्याबरोबरच गडाच्या विकासाकडेही लक्ष वेधण्यात आले.
दसऱ्यानिमित्त गडाच्या महादरवाजाला, गडदेवता मंदिराला आणि पुरातन वास्तूंना पाने-फुलांची तोरणे बांधून पूजन करण्यात आले. पावसाळ्यात वाढलेली झाडीझुडपे साफ करून पायवाटा मोकळ्या करण्यात आल्या आहेत. पावसाळा संपल्यानंतर गडावरील स्वच्छता आणि संवर्धनाच्या कामांना अधिक गती देण्याचा निर्धार दुर्गसंवर्धकांनी व्यक्त केला. या मोहिमेत मावळा प्रतिष्ठानचे प्रवीण गोगावले, राम साने, रोहित भुवड, प्रणय कदम, ऋषिकेष शिंदे, स्वप्नील उतेकर, ओमकार महामुनी, ओम शेटकर, ओमकार सुतार, ऋषी घाडगे, रोहन जाधव, स्नेहा लोखंडे, आकाश नरे आणि वेदांत कदम यांनी सहभाग घेतला.
कांगोरीगडाच्या माचीपर्यंत जाणाऱ्या सुमारे दोन किलोमीटरच्या डांबरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे नूतनीकरण आणि डांबरीकरण करण्याची आवश्यकता आहे. पुढे टाळदेव खिंडीमार्गे पोलादपूर तालुक्यातील सडे किंवा बाळमाची गावाशी हा मार्ग जोडल्यास पिंपळवाडी आणि कामथे ही दोन खोरे परस्परांशी जोडली जाऊ शकतात.
चालू वर्षी मे महिन्यात सडे फाटा ते बाळमाची पठारावरील वाडीपर्यंत पक्क्या डांबरी रस्त्याची बांधणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रस्तावित जोडमार्गाच्या आशा बळावल्या आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यास महाड-पोलादपूरमधील दळणवळण सुलभ होण्यासह कांगोरीगड परिसरातील पर्यटन आणि स्थानिक रोजगारालाही चालना मिळू शकते.
पोलादपूरमधील नागरिकांना महाड औद्योगिक क्षेत्रात जाण्यासाठी जवळचा पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि मावळा प्रतिष्ठानने केली आहे. गडसंवर्धनाबरोबरच दोन खोऱ्यांना जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मानगडावर ‘विजयोदुर्गोत्सव’ उत्साहात
माणगाव (वार्ताहर) : ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सलग १७ वर्षे कार्यरत असलेल्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या सदस्यांनी विजयादशमीनिमित्त मानगडावर ‘विजयोदुर्गोत्सव’ साजरा केला. महादरवाजाला फुलांची तोरणे, पताका आणि रांगोळ्यांनी सजवण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन, श्री शंभूमहादेव व गडदेवता विंझाई देवीचे पूजन आणि ढालकाठी बुरुजावर भगव्या जरीपटका ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. आरत्या, गोंधळगीते आणि गारद यांमधून शिवकालीन परंपरांचा जागर करण्यात आला. आपट्याची पाने देत दुर्गवीरांनी परस्परांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.