मुरबाड, ता. २१ (बातमीदार) : तालुक्याची खास ओळख असलेली पारंपरिक पापड मिरगुंडी आता सातासमुद्रापार पोहोचणार आहे. या स्थानिक खाद्यपदार्थाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याचे स्वप्न उराशी बाळगून आदिवासी तरुण श्रेयस पारधी याने मुरबाड शहराजवळील लांबाचीवाडी येथे स्वयंचलित कारखाना उभारला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. कारखान्यात तयार होणारी मिरगुंडी मलेशिया, सिंगापूर आणि मॉरिशस या देशांत निर्यात केली जाणार आहे.
कारखान्यात मिरगुंडी निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया यंत्राद्वारे केली जाणार आहे. उडीद डाळीचे पीठ तयार करणे, पीठ मळणे, पापड लाटणे, त्यापासून मिरगुंडी तयार करणे आणि ठरावीक वजनाची पाकिटे भरणे, ही सर्व कामे स्वयंचलित यंत्रांच्या साह्याने होणार आहेत. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उत्पादन उपलब्ध व्हावे, यासाठी सध्या प्रत्येकी २०० ग्रॅम वजनाची पाकिटे तयार केली जाणार आहेत. या यंत्राद्वारे बारा तासांत सुमारे २०० किलो वजनाची एक हजार पाकिटे तयार करण्याची क्षमता आहे.
पारंपरिक चवीचे खास वैशिष्ट्य
मुरबाडच्या पापड मिरगुंडीची खासियत म्हणजे ती तयार करण्यासाठी वापरले जाणारे आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेले ‘गुळीचे पाणी’. यामुळे या पदार्थाला विशिष्ट चव आणि वेगळी ओळख मिळते. या पारंपरिक चवीच्या मिरगुंडीला बाजारात मागणी असल्याचे सांगितले जाते. हे पाणी तयार करण्यासाठी सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या साबर, बासार बोंडा, टेटाराची साल, रुईची फुले आणि उडीद पिकाच्या वेलींसारख्या वनस्पतींचा वापर केला जातो. या वनस्पती जाळून तयार झालेली राख पाण्यात उकळली जाते. त्यातून मिळणाऱ्या पाण्याचा वापर उडीद डाळीच्या पिठात करून पीठ मळले जाते. या पारंपरिक पद्धतीमुळे मिरगुंडीला वैशिष्ट्यपूर्ण चव प्राप्त होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.