लोकशाही रक्षणासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे!
‘माकप’चे केंद्र सरकारवर टीकास्त्र; संयुक्त लढ्याचे आवाहन
मुंबई, ता. २१ : देशातील सध्याची राजकीय परिस्थिती, लोकशाही आणि संविधानाचे रक्षण, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) तसेच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याच्या मुद्द्यांवरून भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) अर्थात माकपने केंद्र सरकारवर टीका केली. लोकशाही आणि संविधानावर विश्वास असलेल्या सर्व धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांनी एकत्र येऊन नागरिकांच्या लोकशाही हक्कांच्या रक्षणासाठी संयुक्त लढा उभारावा, असे आवाहन पक्षाच्या नेत्यांनी केले.
मुंबई प्रेस क्लब येथे बुधवारी (ता. २१) माकपच्या मुंबई जिल्हा समितीच्या वतीने देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आयोजित कार्यक्रमात जम्मू-काश्मीरमधील माकपचे नेते आणि पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य कॉ. युसूफ तारीगामी, माकपच्या पॉलिट ब्युरो सदस्य कॉ. मरियम ढवळे, मुंबई जिल्हा सचिव कॉ. शैलेंद्र कांबळे, कॉ. विवेक मोंटेरो उपस्थित होते. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा संदर्भ देत कॉ. युसूफ तारीगामी यांनी देशातील लोकशाही व्यवस्था आणि नागरिकांच्या अधिकारांबाबत चिंता व्यक्त केली. काश्मीरमध्ये घडलेल्या घटनांचे परिणाम देशातील इतर भागांवरही होऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे नागरिकांनी सावध राहून लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकजूट दाखवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. दिल्लीतील अलीकडील परिस्थितीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले, की पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले असताना नेत्यांना रोखण्यात आले, रस्ते बंद करण्यात आले तसेच वाहतूक आणि दळणवळणावर निर्बंध असल्याचा अनुभव आला. ही परिस्थिती पाहून आपण काश्मीरमध्ये आहोत की देशाच्या राजधानीत, असा प्रश्न पडल्याचे त्यांनी नमूद केले.
परिवर्तनाच्या विचारांचा समृद्ध वारसा
महाराष्ट्राला महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा समृद्ध वारसा लाभला आहे. या वारशाचे जतन करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे, असेही कॉ. युसूफ तारीगामी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.