राजेंद्र, मीनाक्षी शिंदे यांना अटक करा
राम पूर्णेकर यांची पत्रकार परिषदेत मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : शिवसेना (ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला २२ दिवस उलटूनही तपासात ठोस प्रगती झाली नसल्याचा आरोप करत त्यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणात राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
पूर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत काही छायाचित्रे आणि व्हिडिओंचा उल्लेख करत गंभीर आरोप केले. राजेंद्र शिंदे आणि संतोष टल्ली यांचा एकत्रित फोटो असल्याचे सांगतानाच, राजेंद्र शिंदे आणि निखिल यादव यांच्यात बंदुकीच्या देवाणघेवाणीशी संबंधित व्हिडिओ असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, एका अन्य व्हिडिओमध्ये राजेंद्र शिंदे हे निखिल यादवला बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. हल्ल्याच्या वेळी हेल्मेट घातलेली व्यक्ती राजा शिंदे असल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी केला. राजेंद्र शिंदे यांच्या छायाचित्राला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने हेल्मेट लावून तुलना केल्याचेही त्यांनी सांगितले. निळकंठ परिसरातील राजेंद्र शिंदे यांच्या घराबाहेर एका व्यक्तीने त्यांना हेल्मेट घालताना पाहिल्याचा दावा पूर्णेकर यांनी केला.
राजेंद्र शिंदे यांच्या मुळशी येथील गावी काही जण बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, एका व्हिडिओमध्ये बॅग घेऊन नाचणारी व्यक्ती कदम असून, ती आपल्या घराजवळ राहत होती आणि घराची रेकी करत होती, असा दावाही त्यांनी केला.
……….
‘२० दिवसांपासून पुरावे देतोय, तरी केवळ चौकशी’
माझ्या वडिलांना जाऊन २२ दिवस झाले. आम्ही पोलिसांना अनेक पुरावे दिले; मात्र अद्याप ठोस कारवाई झाली नाही. गेल्या २० दिवसांपासून आम्ही पुरावे देत आहोत, पण केवळ चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते,’ अशी नाराजी राम पूर्णेकर यांनी व्यक्त केली. उत्तर प्रदेश एसटीएफच्या चौकशीत नगरसेवक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हत्या झाल्याचे समोर आल्याचा दावाही त्यांनी केला.
…….
‘मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा’
माझा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर विश्वास आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला न्यायाची अपेक्षा आहे. त्यांनी भेटीदरम्यान माझ्या पाठीशी असल्याचे सांगितले होते. आता त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे,’ असे आवाहन राम पूर्णेकर यांनी केले. माझ्या जीवाला काही झाले, तर त्याचीही दखल घेतली जावी,’ अशी भीती व्यक्त करत त्यांनी आपल्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. या प्रकरणातील सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.