कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे संरक्षण आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने ‘नॅशनल ॲक्शन फॉर मेकनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम’ (नमस्ते) योजनेचा आढावा घेण्यात आला. कल्याण येथील आचार्य प्र. के. अत्रे रंगमंदिरात बुधवारी झालेल्या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांची नोंदणी, प्रलंबित ई-केवायसी, आयुष्मान कार्ड, वैयक्तिक सुरक्षा साधनांचे वितरण आणि स्वच्छता उद्यमी योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय; तसेच सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाच्या निर्देशानुसार ही बैठक घेण्यात आली होती. या वेळी नमस्ते योजनेच्या राज्य व्यवस्थापक प्रियंका गांगुर्डे, महापालिकेच्या यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पवार, जलनिःसारण-मलनिःसारण विभागाचे उपअभियंता संतोष धांडे आणि अजित देसाई यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन व मलनिःसारण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
मलनिःसारण वाहिन्या आणि सेप्टिक टँकच्या स्वच्छतेचे काम करणारे कर्मचारी तसेच कचरावेचकांची नोंदणी व माहिती संकलन, प्रलंबित ई-केवायसी पूर्ण करणे, आयुष्मान कार्ड उपलब्ध करून देणे आणि वैयक्तिक सुरक्षा साधनांच्या संचाचे (पीपीई किट) वितरण यांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. स्वच्छता उद्यमी योजनेची माहिती देण्याबरोबरच योजनेशी संबंधित ईएसआरयू यंत्रणेच्या वापराबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षा साधनांचे वितरणही करण्यात आले.
शहर स्वच्छ ठेवण्यात सफाई कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, कामाच्या स्वरूपामुळे त्यांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षित कामाचे वातावरण, आरोग्यविषयक सुविधा आणि आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून नमस्ते योजना राबविण्यात येत आहे.
लाभ घेण्याचे आवाहन
महापालिका क्षेत्रातील अधिकाधिक सफाई कर्मचाऱ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी करून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य व्यवस्थापक प्रियंका गांगुर्डे यांनी केले. आयुष्मान कार्डचे महत्त्व, सुरक्षा साधनांचा योग्य वापर आणि स्वच्छता उद्यमी योजनेतून उपलब्ध होणाऱ्या संधींबाबतही त्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य व सुरक्षितता जपणे आणि शासकीय योजनांचे लाभ संबंधित कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविणे, हा या बैठकीचा उद्देश असल्याची माहिती उपआयुक्त रामदास कोकरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.