सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : मालमत्ता कर हा ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असून, चालू आर्थिक वर्षात २० ऑक्टोबरपर्यंत ४९८ कोटी ५२ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यंदा १२०० कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असताना, आतापर्यंत उद्दिष्टाच्या सुमारे ४१.५ टक्के रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. उर्वरित कालावधीत ७०१ कोटी ४८ लाख रुपयांची वसुली करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मालमत्ता कराच्या वसुलीवर भर दिला आहे. नागरिकांना कर भरण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी विविध माध्यमांतून पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रभाग कार्यालयांमधील कर संकलन केंद्रांसह मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रातूनही कर स्वीकारला जात आहे. ऑनलाइन भरण्याच्या सुविधेमुळे नागरिकांना कार्यालयात न जाता कर भरणे शक्य झाले आहे. प्रभागनिहाय आकडेवारीत माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीने आघाडी घेतली असून, तेथून १६४ कोटी ४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्याखालोखाल वर्तकनगर प्रभागातून ७८ कोटी ८० लाख, नौपाडा-कोपरीतून ६८ कोटी ५ लाख आणि उथळसरमधून ३३ कोटी २२ लाख रुपये जमा झाले आहेत. मुख्यालयातील संकलन केंद्रातूनही ६५ कोटी ६० लाख रुपयांचा कर प्राप्त झाला आहे. दुसरीकडे कळवा प्रभाग समितीची वसुली सर्वांत कमी असून, तेथून १५ कोटी १८ लाख रुपये जमा झाले आहेत. मुंब्रा आणि दिवा प्रभागांतून प्रत्येकी १५ कोटी २१ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. लोकमान्य सावरकरनगर प्रभागातून २२ कोटी २४ लाख, तर वागळे इस्टेटमधून २० कोटी ९७ लाख रुपये जमा झाले आहेत.
................................
मागील वर्षाच्या तुलनेत उद्दिष्ट मोठे
२०२५-२६ या आर्थिक वर्षात ठाणे महापालिकेने मालमत्ता करातून ८७८ कोटी ३७ लाख रुपयांची वसुली केली होती. यंदा हे उत्पन्न वाढवून १२०० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मागील वर्षातील वसुलीपेक्षा यंदा ३२१ कोटी ६३ लाख रुपयांचा अतिरिक्त महसूल जमा करावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.