३२ तासांनी देवालयात परतले धावीर महाराज
सेवेकरी तरुणांच्या अथक परिश्रमांनी पालखी सोहळ्याची सांगता
रोहा, ता. २२ (बातमीदार)ः रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याची गुरुवारी (ता. २२) दुपारनंतर भक्तिमय वातावरणात सांगता झाली. बुधवारी (ता. २१) पहाटे सुरू झालेला हा सोहळा तब्बल ३२ तासांनंतर महाराजांच्या मंदिरात पुनरागमनाने पूर्ण झाला. शहरातून पालखीची प्रदक्षिणा, ग्रामस्थांच्या बंधुभेटी आणि हजारो भाविकांच्या जयघोषाने रोहा नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. या वेळी रोहा पोलिस निरीक्षक अभय शेलार व त्यांच्या पथकाने महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली. महाआरती, सेवेकऱ्यांचे मानपान आणि सन्मान सोहळ्यानंतर उत्सवाची सांगता करण्यात आली.
एका कुटुंबाच्या सोहळ्याप्रमाणे संपूर्ण गावाला एकत्र आणणाऱ्या या उत्सवात हजारो भक्तांनी रात्र जागून काढली. समेळ, हळगी, खालुबाजे, झांज पथके, ताशे आणि विविध वाद्यपथकांनी सोहळ्याची शोभा वाढवली. चेंबूर, अलिबाग, कल्याण आणि रोहा येथील वाद्य व नगारे पथकांच्या सहभागाने उत्सवातील उत्साह अधिकच वाढला. परंपरेनुसार मंदिर ट्रस्ट आणि उत्सव समितीच्या वतीने रायगड पोलीस, महसूल विभाग, रोहा नगर परिषद, महावितरण विभाग, उत्सवाचे मानकरी आणि अखंड सेवा देणाऱ्या सेवेकऱ्यांचा प्रसादाचा नारळ देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष कुमार पाशिलकर, सरचिटणीस दर्शन कदम, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, विश्वस्त नितीन परब, महेश सरदार, प्रकाश पवार, लालताप्रसाद कुशवाह, संदीप सरफळे, मयूर पायगुडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्ट आणि उत्सव समितीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकारिणी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
अनवाणी सेवेत तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग
पालखी सोहळ्यातील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे अनेक तरुणांनी तब्बल ३२ तास अनवाणी पायांनी पालखीसोबत राहून सेवा बजावली. कडक उन्हाची पर्वा न करता महाराजांचा जयघोष करत या सेवेकऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली.
सेवेकऱ्यांच्या योगदानाचा गौरव
उत्सव समितीचे अध्यक्ष कुमार पाशिलकर, कार्यवाह दर्शन कदम, उपाध्यक्ष सागर कोलटकर, सचिन पाशिलकर, सहकार्यवाह नागेश पाटणकर व ओंकार गुरव, खजिनदार सूरज राऊत आणि सहखजिनदार ओंकार काफरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आयोजनात योगदान दिले. पोलीस, प्रशासन, विविध वाद्यपथके आणि सेवेकऱ्यांच्या समन्वयातून सोहळा पार पडला. धार्मिक परंपरेसोबत सामाजिक एकोपा जपणाऱ्या या उत्सवाने रोहेकरांच्या सामूहिक श्रद्धेचे दर्शन घडवले.
फोटो कॅप्शन : श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याची दुसऱ्या दिवशी सशस्त्र मानवंदना देऊन सांगता करताना पोलिस अधिकारी आणि उपस्थित हजारो भाविक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.