सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : घोडबंदर मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्ते रुंदीकरण आणि मुख्य रस्त्यांना सेवा रस्ते जोडण्याची कामे केली जात आहेत. मात्र, रस्त्यांच्या मध्यभागी असलेले विद्युत खांब वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत होते. अखेर या अडथळ्यांवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी ठाणे महापालिकेने विद्युत खांब हटविण्याची आणि वीजवाहिन्या भूमिगत टाकण्याची मोहीम सुरू केली आहे. या प्रकल्पात एकूण १९९ विद्युत खांब हटविण्यात येणार असून, आतापर्यंत २१ खांब स्थलांतरित करण्यात आले आहेत.
घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध ठिकाणी मुख्य रस्ता आणि सेवा रस्त्यांची जोडणी करण्यात आली आहे. मात्र, रस्त्यांची कामे पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली तरी मधोमध असलेले विद्युत खांब आणि विद्युत पेट्या कायम राहिल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. रात्रीच्या वेळी हे खांब लक्षात न आल्यास वाहनांची थेट धडक होण्याची शक्यता होती. त्यामुळे या अडथळ्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याची गरज निर्माण झाली होती. रस्ते जोडणीच्या मूळ कामात विद्युत खांब हटविण्याचा समावेश नसल्याने त्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया राबवावी लागली. महापालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण केली; मात्र पावसाळ्यामुळे प्रत्यक्ष कामाला अपेक्षित गती मिळू शकली नाही. तोपर्यंत खांबांवर पांढरे पट्टे आणि लाल-पिवळ्या रंगाचे परावर्तित स्टिकर लावून वाहनचालकांना सावध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता पावसाळा संपल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
....................................
पदपथाखालील डक्टचा वापर
विद्युत खांब हटविण्याबरोबरच उच्चदाब आणि लघुदाबाच्या वीजवाहिन्या भूमिगत टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी पदपथाखाली तयार केलेल्या विशेष वाहिनी मार्गांचा (डक्ट) वापर केला जाणार आहे. या संपूर्ण कामात सुमारे १५० किलोमीटर लांबीच्या वीजवाहिन्या भूमिगत टाकण्याचे नियोजन आहे. त्यापैकी ७० किलोमीटर लांबीच्या वाहिन्या उपलब्ध झाल्या असून, ४६ किलोमीटर लांबीच्या वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे १९९ विद्युत खांब आणि ४१ विद्युत पेट्या हटविण्यात येणार आहेत. याशिवाय तीन विद्युत रोहित्रे आणि ४४ मुख्य वितरण संच बसविण्याचे नियोजन आहे. यामुळे रस्त्यांवरील विद्युत यंत्रणेचे स्थलांतर करून वाहतुकीतील अडथळे कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
..................................
भाईंदर नाका ते आनंदनगरदरम्यान काम पूर्ण
भाईंदर नाका ते आनंदनगर या टप्प्यात २१ विद्युत खांब आणि ७० विद्युत पेट्या हटविण्यात आल्या आहेत. ओवळा ते भाईंदरपाडा या मार्गावर आणखी ३१ विद्युत खांब हटविण्यात येणार आहेत. उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
..............................
मे अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन
विद्युत खांब स्थलांतर आणि भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांवरील अडथळे कमी होऊन वाहनचालकांना अधिक सुरक्षितपणे प्रवास करता येईल. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या प्रयत्नांना त्यामुळे हातभार लागण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.