भेसळीच्या संशयावरून ४३ टन अन्नसाठा जप्त
मुंबई, ता. २५ : भेसळीचा संशय, निकृष्ट गुणवत्ता आणि चुकीचे लेबलिंग यामुळे नागरिकांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर राबविलेल्या विशेष मोहिमेत सुमारे ४३.५६ टन अन्नपदार्थांचा साठा जप्त केला असून, त्याची किंमत सुमारे १.५६ कोटी रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले.
हळद, मिरची पावडर, खवा, खाद्यतेल, मसाले आणि तुपाच्या साठ्यांवर कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधातही विविध विभागांत छापे टाकण्यात आले. छत्रपती संभाजीनगर विभागात २६.८४ टन अन्नपदार्थ जप्त करण्यात आले असून, त्यांची किंमत ६४ लाख रुपये आहे. हिंगोलीतील गणराज इंडस्ट्रीजमधून २३.७ टन हळद पावडर जप्त करण्यात आली. तिची किंमत ५९.५० लाख रुपये आहे. नांदेडमध्ये मिरची पावडर आणि मीठ, तर लातूरमध्ये १,२१७ किलो मिरची पावडर जप्त करण्यात आली.
पुणे विभागात २.११ टन खवा आणि विविध मसाल्यांचा सुमारे ७.९३ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. नाशिक विभागात ४,०६९ किलो अन्नपदार्थ आणि ६२.२ लिटर तूप जप्त करण्यात आले. यामध्ये ३,२१० किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा समावेश आहे. नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यात पुनर्वापर केलेल्या डब्यांमध्ये साठवलेले ८८३.३ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले.
कोकण विभागात मसाले, धणे, सुका मेवा, बिया, चिंच, आणि कच्चे म्हशीचे दूध यांसह विविध अन्नपदार्थांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या स्वतंत्र कारवाईत पुण्यात १९.५६ लाख रुपये, तर ग्रेटर मुंबईत ४.२२ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.