मेंदूमृत ५२ वर्षीय महिलेच्या अवयवदानातून सहा रुग्णांना जीवदान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबईत यंदाचे ५०वे मृत व्यक्तीचे अवयवदान २२ ऑक्टोबरला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात झाले. मेंदूत रक्तस्राव झाल्यानंतर मेंदूमृत घोषित करण्यात आलेल्या ५२ वर्षीय महिलेच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. या अवयवदानामुळे पाच ते सहा रुग्णांना जीवदान मिळणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २३ ऑक्टोबरला ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात यंदाचे ५१वे अवयवदान झाले.
५२ वर्षीय महिलेला मेंदूत रक्तस्राव झाल्यानंतर उपचारांसाठी नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. वैद्यकीय तपासण्यांनंतर त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातील समुपदेशन पथकाने कुटुंबीयांशी अवयवदानाबाबत चर्चा केली.
महिलेच्या ८७ वर्षीय आईने कठीणप्रसंगी अवयवदानास संमती दिली. संबंधित महिलेने यापूर्वीच आपल्या एका मैत्रिणीकडे अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे, तिच्या कुटुंबीयांनाही तिची इच्छा माहिती होती. या अवयवदानातून हृदय, फुफ्फुसे, यकृत आणि मूत्रपिंडे तसेच डोळ्यांचे पडदे आणि अन्य ऊती दान करण्यात आल्या. राज्यातील अवयव प्रत्यारोपणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या अवयवांचे वाटप करण्यात आले. त्यापैकी एक मूत्रपिंड नवी मुंबईतील संबंधित रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी वापरण्यात आले.
अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज
अवयवांची मागणी मोठी असून प्रत्यारोपणासाठी योग्य अवयवाची प्रतीक्षा करताना अनेक रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे अवयवदानाबाबत समाजात अधिक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान, २३ ऑक्टोबरला ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात ४१ वर्षीय मेंदूमृत महिलेचे अवयवदान झाले. यामध्ये यकृत, मूत्रपिंडे आणि हाडांच्या ऊतींचे दान करण्यात आले. या अवयवांचेही राज्याच्या नियमांनुसार वाटप करण्यात आले. सलग दोन दिवस झालेल्या या अवयवदानामुळे गरजू रुग्णांना अवयव उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.