सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : सोन्याचे दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने तीन व्यावसायिकांकडून ७४ लाख ६४ हजारांचे सोने आणि रोकड स्वीकारून कारागीर पसार झाल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला आहे. याप्रकरणी सोनार नितीन घोरडिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ठाणेनगर पोलिस ठाण्यात हाफिजूल शाह (वय २७) या संशयित कारागिराविरोधात गुन्हा दाखल झाल्याची पोलिसांनी दिली.
घोरडिया यांचे जांभळी नाका परिसरात ‘सत्यम गोल्ड’ नावाने कार्यालय आहे. ते आठ वर्षांपासून हाफिजूलकडे दागिने बनविण्यासाठी सोने देत होते. ९ ते २२ ऑक्टोबरदरम्यान त्यांनी दागिने बनविण्यासाठी सुमारे २९८ ग्रॅम सोने दिले होते. मात्र, कारागीर काम पूर्ण करण्यास टाळाटाळ करीत असल्याने घोरडिया हे शुक्रवारी (ता. २३) त्याच्या कारखान्यात गेले. या वेळी दुरुस्तीसाठी दिलेले मंगळसूत्र गहाण ठेवल्याचे हाफिजूलने सांगितले. ते परत आणण्याच्या बहाण्याने तो निघून गेला; मात्र त्यानंतर त्याचा फोन बंद झाला.
दरम्यान, गोविंददास वैष्णव यांनी २० लाखांचे १५४ ग्रॅम सोने, तर नीलम विनेरकर यांनी ११.७० लाख रुपये रोख आणि सोन्याच्या चेनसाठी सोने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तिघांचे मिळून ५१०.०९ ग्रॅम सोने आणि ११.७० लाखांची रोकड, अशी एकूण ७४.६४ लाखांची मालमत्ता परत न करता संशयित पसार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.