मुंबई

अवाजवी वीजबिलांनी ग्राहक हैराण

CD

वज्रेश्वरी, ता. २५ (बातमीदार) : प्रत्यक्ष वीजवापरापेक्षा अधिक युनिट दाखवून अवाजवी वीजबिले पाठविणे आणि ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसविणे, या प्रकारांमुळे अंबाडी विभागातील वीजग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सरासरी बिलाच्या नावाखाली २०० युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना ५०० ते ६०० युनिटचे बिल पाठविले जात असल्याचा आरोप अंबाडी विभाग कृती समितीने केला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने ग्राहकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, या आरोपांबाबत महावितरणच्या अभियंत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

मागील वर्षी जूनमध्ये २०० युनिट वीजवापराचे बिल आलेल्या ग्राहकांना यंदा सरासरीच्या नावाखाली ५०० ते ६०० युनिटचे बिल पाठविले जात असल्याची उदाहरणे समोर येत असल्याचा दावा वीजग्राहक संघटनेच्या अध्यक्षांनी केला आहे. या वाढीव बिलांमुळे ग्राहक आर्थिक अडचणीत सापडले असून, बिलातील तफावत दूर करण्यासाठी त्यांना महावितरण कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. अवाजवी बिल आल्यास ग्राहकांनी लेखी तक्रार दाखल करावी आणि सुरक्षा अनामत रकमेबाबतही दक्ष राहावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

अवाजवी सरासरी बिले पाठवून ग्राहकांना मीटर तपासणी करण्यास भाग पाडले जाते आणि त्यानंतर जुने मीटर सदोष असल्याचे सांगून नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचा मार्ग मोकळा केला जात असल्याचा संशय वीजग्राहक संघटनेच्या अध्यक्षांनी व्यक्त केला आहे. ग्राहकांनी स्वखर्चाने बसविलेले मीटर ठोस कारण न देता बदलले जात असल्याचा दावा कृती समितीने केला आहे. मीटर बदलण्यापूर्वी ग्राहकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी समितीने केली आहे. मात्र, याला महावितरणकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण न करता स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरूच राहिल्यास अंबाडी विभागात व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अंबाडी विभाग कृती समितीचे केशव लाटे यांनी दिला आहे.

आश्वासनानंतरही काम सुरूच
स्मार्ट मीटर बसविण्याला विरोध दर्शविणारे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून एका महिन्यात निर्णय कळविण्यात येईल. तसेच, निवेदनावर उत्तर मिळेपर्यंत मीटर बसविण्याचे काम केले जाणार नाही, असे आश्वासन मिळाल्याचा दावा समितीने केला आहे. मात्र, तीन महिने उलटूनही पुढील बैठक झालेली नाही किंवा निवेदनाबाबत निर्णय कळविण्यात आलेला नाही. दुसरीकडे, विभागात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरूच आहे.

२६७ युनिट वापर, बिल ३७५ युनिटचे?
अंबाडी येथील एका ग्राहकाने २६७ युनिट वीज वापरली असताना प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता ३७५ युनिट वीजवापर दाखवून चार हजार ८५० रुपयांचे बिल तयार केल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. याप्रकरणी संबंधित अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गणेशपुरी, वज्रेश्वरीतही नाराजी
अंबाडीप्रमाणेच गणेशपुरी, वज्रेश्वरी, अकलोली, सायवन, पारोळ आणि शिरसाड परिसरातही स्मार्ट मीटर बसविणे आणि वीजबिलांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन बिलांची फेरतपासणी करावी, मीटर बदलण्याबाबतची भूमिका स्पष्ट करावी आणि कृती समितीला दिलेल्या आश्वासनानुसार बैठक घ्यावी, अशी मागणी मनसेचे गणेशपुरी विभाग अध्यक्ष सुनील देवरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे अपडेट्स! केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी काय महत्त्वाचं?

Thane News: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! श्रमजीवीच्या मोर्चामुळे वाहतुकीत बदल, अनेक रस्ते बंद; काय असतील पर्यायी मार्ग?

Breast Cancer: पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; 'या' बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra Live News: शिरूर नगर परिषदेत भाजपच्या ११ नगरसेवकांचा सत्तापक्षाला पाठिंबा

Pune News : ‘बार्टी’, ‘सारथी’ला पूर्णवेळ प्रमुख कधी मिळणार? ‘बार्टी’चा सात तर ‘सारथी’चा तीन महिन्यांपासून प्रभारींच्या हाती कारभार

SCROLL FOR NEXT