कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : सलग ३६ तास पाणीपुरवठा खंडित झाल्याने त्रस्त झालेल्या डोंबिवली एमआयडीसी निवासी क्षेत्रातील रहिवाशांच्या आक्रोश मोर्चाचा परिणाम दिसू लागला आहे. एमआयडीसी कार्यालयावर काढलेल्या मोर्चानंतर प्रशासनाने रहिवाशांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत शटडाऊनच्या कालावधीत बदल, पाणीचोरी व जलवाहिनी गळतीवर कारवाई आणि बोअरवेलसाठी सशर्त परवानगी अशा मुद्द्यांवर सकारात्मक आश्वासने देण्यात आली. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
सलग ३६ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याऐवजी आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी २४ आणि १२ तासांचा शटडाऊन घेण्याची मागणी रहिवाशांच्या प्रतिनिधींनी केली. यावर एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता श्रीकांत राऊत यांनी हा प्रस्ताव जलसंपदा विभाग आणि वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून त्यासाठी स्वतः प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
घरडा सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ मोठ्या जलकुंभाचे बांधकाम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीसाठवण क्षमता वाढून गरजेच्या वेळी पाणीपुरवठा करणे शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. आक्रोश मोर्चानंतर प्रशासनाने चर्चेची भूमिका घेतली असली, तरी रहिवाशांचा पाणीप्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. त्यामुळे आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष निर्णय आणि अंमलबजावणीतून दिलासा मिळतो का, याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
पाणीचोरी, अनधिकृत जोडण्यांवर कारवाई
पाणीचोरी, अनधिकृत नळजोडण्या आणि पाइपलाइनमधून होणारी गळती यामुळे पाण्याची समस्या अधिक गंभीर होत असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावर एमआयडीसी, पोलिस आणि महापालिकेचे संयुक्त पथक तयार करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. मिलापनगर तलावातील पाणी शुद्ध करून इमारतींना बिगर-पिण्याच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरही विचार करण्याचे सांगण्यात आले.
बोअरवेलच्या परवानगीमुळे दिलासा मिळण्याची आशा
एमआयडीसी क्षेत्रातील भूखंडधारकांना काही अटी व शर्तींच्या अधीन राहून बोअरवेल खोदण्याची परवानगी देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंत्यांनी दिली. यापूर्वी विविध कारणांमुळे या क्षेत्रात बोअरवेलसाठी परवानगी दिली जात नव्हती. त्यामुळे हा निर्णय झाल्यास रहिवाशांना पाणीटंचाईत काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
आश्वासनांनंतर आता अंमलबजावणीची प्रतीक्षा
या बैठकीला माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे, विवेक देशपांडे, राजू नलावडे, संजय चव्हाण, हरी नायर, अश्विनी भंडारी आणि डॉ. सुनेत्रा जावकर हे रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एमआयडीसीतर्फे कार्यकारी अभियंता श्रीकांत राऊत, उपअभियंता औदुंबर आलाट, सहाय्यक अभियंते गणेश जंगले आणि नीलेश गोपाळे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.