कांदा-बटाटा मार्केटमधून चोरी
जुईनगर, ता. २५ (बातमीदार) : एपीएमसीच्या कांदा-बटाटा घाऊक बाजारातून शेतमाल चोरी करून रिक्षातून पळ काढणाऱ्या चोरट्यांना बाजार समितीच्या सतर्क सुरक्षा रक्षकांनी पाठलाग करून पकडले. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेत चोरट्यांनी लसणाच्या गोण्या रिक्षात भरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी फिल्मी स्टाइलने पाठलाग करत सानपाडा येथील मोराज सर्कलजवळ रिक्षा अडवली आणि चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.
कांदा-बटाटा घाऊक बाजारातील सी विंगमधून पहाटेच्या सुमारास लसणाच्या गोण्यांची चोरी करण्यात आली. चोरीचा माल रिक्षामध्ये भरून चोरटे बाजार आवारातून बाहेर पडण्याच्या तयारीत होते. याच वेळी रात्रीच्या गस्तीवर असलेले सुरक्षा रक्षक शिवाजीराव यशवंत पाटील यांच्या नजरेस संशयास्पद हालचाली आल्या. त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने कारवाई केली आणि वरिष्ठ सुरक्षा यंत्रणेला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा पर्यवेक्षक संजय रावते यांनी शिवाजीराव पाटील आणि संजय रावते परस्पर समन्वय साधत रिक्षेचा पाठलाग सुरू केला. अखेर मोराज सर्कल परिसरात रिक्षा अडविण्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांना यश आले. त्यानंतर लसणाच्या गोण्यांसह रिक्षा आणि संबंधित आरोपींना एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
गेल्या अनेक महिन्यांपासून बाजार आवारात शेतमाल चोरीच्या घटना घडत असल्याने व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. बाजारात मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक-जावक सुरू असते. विशेषतः रात्री आणि पहाटेच्या वेळेत होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवणे सुरक्षा यंत्रणेसाठी महत्त्वाचे ठरते. अशा परिस्थितीत सुरक्षा रक्षकांनी दाखविलेल्या सतर्कतेचे बाजार आवारातील व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे.