उल्हासनगर, ता. २५ (बातमीदार) : दिवाळीच्या खरेदीसाठी उल्हासनगरच्या कॅम्प-२ मधील बाजारपेठेत होणारी गर्दी आणि कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. नेहरू चौक, शिरू चौक, जपानी मार्केट आणि गजानन मार्केट परिसरातील वाढती वर्दळ लक्षात घेऊन ८ नोव्हेंबरपर्यंत वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. अमन रोड ते नेहरू चौक आणि नेहरू चौक ते शिरू चौक या मार्गांवर दुचाकी वगळता अन्य वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
उल्हासनगर कॅम्प-२ मधील नेहरू चौक ते शिरू चौक परिसरात कपडे आणि विविध वस्तूंची मोठी घाऊक बाजारपेठ आहे. याच परिसरातील जपानी मार्केट आणि गजानन मार्केटमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी व्यापारी व ग्राहकांची मोठी गर्दी होते. दुसरीकडे नेहरू चौक ते अमन रोडदरम्यान विद्युत साहित्य आणि फटाक्यांची घाऊक दुकाने असल्याने या मार्गावरही वाहनांची वर्दळ वाढते. सणासुदीच्या काळात पादचारी, खरेदीसाठी येणारे ग्राहक आणि मालवाहू वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती टाळून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी विशेष वाहतूक अधिसूचना जारी केले असून वाहतुकीतील बदल निश्चित केले आहेत.
अमन रोडवरून नेहरू चौकाकडे जाणाऱ्या दुचाकी वगळता अन्य सर्व वाहनांना पटेल मार्ट चौक येथे प्रवेशबंदी असेल. या वाहनचालकांनी पटेल मार्ट चौकातून डावीकडे वळून हिरा मॅरेज हॉल, मधुबन चौक आणि गोल मैदानमार्गे पुढे इच्छित स्थळी जावे. नेहरू चौकातून शिरू चौकाकडे जाणाऱ्या दुचाकी वगळता अन्य सर्व वाहनांना नेहरू चौक येथे प्रवेशबंदी असेल. या वाहनांनी देवी भवानी चौक आणि गोल मैदानमार्गे उल्हासनगर क्रमांक-१ कडून पुढे इच्छित स्थळी जावे.
मालवाहतुकीसाठीही वेळेचे बंधन
बाजारपेठेत मालाची चढ-उतार करताना वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी विशेष वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. अमन रोड ते नेहरू चौक आणि नेहरू चौक ते शिरू चौक या दोन्ही मार्गांवर दुपारी १२.३० ते रात्री १२ वाजेपर्यंत माल चढविणे आणि उतरविण्यासाठी प्रवेश बंद राहणार आहे. रात्री १२.०१ ते दुपारी १२.३० या वेळेत मात्र मालाची चढ-उतार करण्यासाठी प्रवेश सुरू राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.