अतिक्रमण कारवाईत दुजाभाव?
महिलांना रोजगारासाठी जागा देण्याची नगरसेविकेची मागणी
पनवेल, ता. २५ (बातमीदार) : पनवेल पालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये अतिक्रमणांवरील कारवाई करताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप नगरसेविका मेघना घाडगे यांनी केला आहे. कातकरी व आदिवासी महिलांच्या छोट्या व्यवसायांवर तत्परतेने कारवाई केली जाते; मात्र गॅरेज लाइन आणि जवाहर औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अतिक्रमणांवरील कारवाईत समान निकष पाळण्याबरोबरच गरजू महिलांना रोजगारासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
दसरा, दिवाळी यांसारख्या सणांच्या काळात कातकरी व आदिवासी महिला छोटे व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या व्यवसायांवर कारवाई करण्यास आपला विरोध नसला, तरी कारवाई सर्व अतिक्रमणांवर समान पद्धतीने झाली पाहिजे, अशी भूमिका घाडगे यांनी मांडली. यासंदर्भात लेखी तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याचा दावा त्यांनी केला. याप्रकरणी महापालिका आयुक्तांनी सभागृहात स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
वारंवार अतिक्रमण कारवाईला सामोरे जावे लागणाऱ्या आदिवासी व मागास समाजातील महिलांच्या रोजगाराचा प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची गरज आहे. या महिलांना सन्मानाने व्यवसाय करता यावा, यासाठी महापालिकेने योग्य जागा किंवा भूखंड उपलब्ध करून द्यावा. तेथे व्यवसायासाठी आवश्यक परवानग्या आणि मूलभूत सुविधा देऊन त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन घाडगे यांनी महापौरांकडे केले आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर लक्ष
दरम्यान, महापालिकेच्या विविध कामांसाठी नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य करण्याची मागणीही घाडगे यांनी केली. कर्मचाऱ्यांना ओळखपत्र, गणवेश आणि आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावीत. तसेच कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि कामाचे तास तपासल्यानंतरच संबंधित कंत्राटदारांची बिले मंजूर करावीत, असे त्यांनी सुचविले.