पाणथळ जागांचे चार महिन्यांत सीमांकन
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; फ्लेमिंगोंच्या अधिवास संरक्षणाची आशा
तुर्भे, ता. २५ (बातमीदार) : नवी मुंबईतील पाणथळ जागा आणि त्यांवर अवलंबून असलेल्या फ्लेमिंगोंसह अन्य पक्ष्यांच्या अधिवासाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाचा ताजा आदेश महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. देशातील जलस्रोतांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांची निश्चित ओळख आणि सीमांकन करण्याचे निर्देश राज्य सरकारे व संबंधित पाणथळ प्राधिकरणांना देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया चार महिन्यांत पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे अतिक्रमण, मातीचा भराव आणि विकासकामांच्या दबावामुळे धोक्यात आलेल्या नवी मुंबईतील पाणथळ जागांच्या संवर्धनाला बळ मिळण्याची अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.
‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील पाणथळ जागा स्थलांतरित रोहित पक्ष्यांसह विविध पक्ष्यांचे महत्त्वाचे अधिवास आहेत. त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे आणि जलसुरक्षा टिकविण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे, मात्र अतिक्रमण आणि भरावामुळे या नैसर्गिक परिसंस्थेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठाने जलस्रोतांचे महत्त्व अधोरेखित करताना, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि नागरिकांच्या जगण्याच्या अधिकाराशी त्यांचे संरक्षण संबंधित असल्याचे स्पष्ट केले. मौल्यवान जलस्रोत असुरक्षित राहिल्याने होणाऱ्या परिणामांकडे न्यायालये दुर्लक्ष करू शकत नाहीत, असेही खंडपीठाने नमूद केले.
पाणथळ जागांशी संबंधित नियम प्रसिद्ध होऊन नऊ वर्षे उलटूनही अनेक ठिकाणी जलस्रोतांची प्रत्यक्ष पडताळणी आणि सीमांकन पूर्ण झालेले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित राज्ये व प्राधिकरणांना प्रत्यक्ष स्थळपाहणी करून जलस्रोतांच्या हद्दी निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे. या प्रक्रियेबाबत अनुपालन प्रतिज्ञापत्रही सादर करावे लागणार आहे.
पक्षीप्रेमी आनंद आर्य, अँड. एम. के. बालकृष्णन आणि वनशक्ती या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हे निर्देश देण्यात आले. नवी मुंबईतील पाणथळ जागांचे सीमांकन झाल्यास अतिक्रमणे ओळखणे आणि संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करणे सुलभ होऊ शकते. त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी कशी होते, याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.