भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी कपात योग्यच
आमदार मंदा म्हात्रे यांचा महापौर सुजाता पाटील यांना सल्ला
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २५ : पालिकेतर्फे वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना आमदार मंदा म्हात्रे यांनी शहरातील पाण्याचा प्रश्न आणि भविष्यातील पाणीटंचाईच्या धोक्याकडे लक्ष वेधत महापौर सुजाता पाटील आणि पालिका प्रशासनाला आठवड्यातून एकदा नियोजनबद्ध पाणीकपात करण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला.
सध्या मोरबे धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने अनेक नगरसेवक पाणीकपात करू नये, अशी मागणी करीत आहेत. यावर भाष्य करताना आमदार म्हात्रे म्हणाल्या, की आज धरणात पाणी उपलब्ध असले तरी संपूर्ण राज्य दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करीत आहे. हवामानातील बदलांमुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, पाण्याचा वापर असाच अनियंत्रित राहिला तर ऐन उन्हाळ्यात तीव्र टंचाई निर्माण होईल. आज जे नगरसेवक पाणीकपातीला विरोध करीत आहेत, तेच उद्या पाणी संपल्यावर प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना दोष देतील. त्यामुळे भविष्यातील संकट टाळण्यासाठी नागरिकांनी आणि पालिकेने आतापासूनच पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे. याप्रसंगी त्यांनी शहरासाठी मोरबे धरण मिळवताना झालेल्या संघर्षाची आठवण करून दिली. तत्कालीन पालिका आयुक्त सुनील सोनी यांच्या कार्यकाळात पालिकेकडे निधीची चणचण असतानाही महाराष्ट्र शासनाकडून अत्यंत बिकट परिस्थितीत मोरबे धरण खरेदी करण्यात आले होते, याचा उल्लेख करीत त्यांनी पालिकेच्या स्वतःच्या पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
पाणीबचतीसाठी महत्त्वाचे उपाय
पाणीबचतीचे उपाय सुचवताना त्यांनी मोरबे धरणातील गाळ काढणे, धरण क्षेत्रातील टेकड्या हटवून पाणीसाठा क्षमता वाढवणे आणि धरण परिसरातील हॉटेलच्या सांडपाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. तसेच कार वॉशिंग सेंटर, री-डेव्हलपमेंटच्या कामांसाठी पिण्याचे मुबलक पाणी वापरण्याऐवजी री-सायकल पाण्याचा वापर सक्तीचा करावा, असा आग्रह धरला. ज्याप्रमाणे घरातील महिला पिठाची बचत करून कुटुंबाच्या अन्नाचे नियोजन करते, त्याच धर्तीवर महिला महापौर म्हणून सुजाता पाटील यांनी शहराच्या पाण्याचे दूरदृष्टीने नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.