फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करा
नगरसेवक परिषा सरनाईक यांचे आयुक्तांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : दिवाळीत वायू आणि ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी सार्वजनिक रस्ते व पदपथांवर फटाके फोडण्यास प्रतिबंध घालण्याबरोबरच रस्त्यालगत उभारण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या स्टॉलवरही बंदी घालावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनिप्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासह पर्यावरणासाठी चिंतेचा विषय बनले आहे. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पशुपक्ष्यांना त्रास सहन करावा लागतो. सततच्या आवाजामुळे तणाव वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. त्यात यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे उष्णतेचा सामना करावा लागत असल्याने प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे. सार्वजनिक रस्ते आणि शांतता क्षेत्रांमध्ये फटाके फोडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी समन्वय साधून स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्त राव यांच्याकडे केली आहे.
………………..
रस्त्यांवरील फटाका स्टॉलमुळे सुरक्षेचा प्रश्न
दिवाळीच्या आधीपासून शहरातील रस्त्यांकडेला फटाक्यांची दुकाने उभारली जातात. यामध्ये अधिकृत स्टॉलसोबत अनधिकृत दुकानेही असण्याची शक्यता असून, अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन होत नसल्यास दुर्घटनेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रस्त्यालगतच्या फटाका विक्री केंद्रांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकृत तसेच अनधिकृत स्टॉलवर कारवाई करावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.
--------