पनवेलच्या क्रिकेटला नवी झळाळी
१.२६ कोटींच्या मैदानाचा प्रस्ताव महासभेत
पनवेल, ता. २६ (बातमीदार) : एकेकाळी संपूर्ण रायगड जिल्ह्यात दबदबा निर्माण करणाऱ्या पनवेलच्या क्रिकेटला गतवैभव मिळवून देण्यासाठी शहरात आधुनिक क्रिकेट मैदान विकसित करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. पनवेल पालिकेच्या महासभेत मांडण्यात आलेल्या या प्रस्तावानुसार, प्रभाग समिती ‘ड’अंतर्गत प्रभाग क्रमांक १४ मधील भूखंड क्रमांक ५०८ (पार्ट) आणि ५२० (पार्ट) येथे मैदान उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे एक कोटी २६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मैदानात दर्जेदार सराव सुविधा आणि आधुनिक सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक तथा भाजपचे पनवेल शहराध्यक्ष सुमित उल्हास झुंजारराव यांनी केली आहे.
एकेकाळी पनवेलच्या क्रिकेटविश्वात सोसायटी, युनिटी, नानू फुलवाद, हरिओम, नवज्योत, स्मॅश, इलेव्हन फायटर आणि मंगलमूर्ती यांसारख्या संघांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मिडल क्लास सोसायटी आणि व्ही. के. स्कूलच्या मैदानांवर नियमित सरावातून अनेक गुणवंत खेळाडू घडले. मात्र, वाढते शहरीकरण आणि मैदानांची कमतरता यामुळे क्रिकेटच्या सरावासाठी उपलब्ध जागा कमी झाल्या. परिणामी स्थानिक खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
नवीन मैदानामुळे शहरातील क्रिकेट संस्कृतीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. केवळ मैदान उभारण्यापुरता हा प्रकल्प मर्यादित न राहता, नवोदित खेळाडूंना सरावाची संधी मिळावी, जुन्या संघांचा वारसा जपला जावा आणि भविष्यात गुणवंत क्रिकेटपटू घडावेत, यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यावर झुंजारराव यांनी भर दिला आहे. क्रिकेट सामने पाहण्यास येणाऱ्या प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलरी आणि उन्हापावसापासून संरक्षण देणारे शेड उभारण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
आधुनिक सुविधांचा आग्रह
प्रस्तावित मैदानाच्या चारही बाजूंना संरक्षक कुंपण उभारून मैदानात वाहनांचा प्रवेश रोखावा. एकाच वेळी सात ते आठ संघांना सराव करता येईल, अशा पुरेशा सराव विकेट्स तयार कराव्यात. तसेच मध्यभागी दर्जेदार टर्फ विकेट उभारून लेदर बॉलवरील सामने आणि क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी झुंजारराव यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.