सभागृहातून लोकशाहीचे धडे
विद्या भवनच्या विद्यार्थ्यांची महापालिका मुख्यालयाला भेट
नेरूळ, ता. २६ (बातमीदार) : पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून लोकशाही व्यवस्था आणि शहर प्रशासनाची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी नेरूळ येथील विद्या भवन प्रायमरी मराठी स्कूलच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला भेट दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी महापालिकेचे कामकाज जवळून पाहण्यासह सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे निरीक्षण केले. लोकप्रतिनिधी नागरिकांचे प्रश्न कसे मांडतात, त्यावर कशी चर्चा होते आणि समस्यांवर उपाययोजना कशा सुचवल्या जातात, याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा मिसाळ यांच्या पुढाकारातून आयोजित या शैक्षणिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी सभागृहातील कामकाज बारकाईने पाहिले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी नागरिकांच्या समस्या मांडताना कोणते मुद्दे उपस्थित करतात, तसेच विविध विषयांवर चर्चा करून निर्णयप्रक्रिया कशी पुढे जाते, हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समजून घेता आले.
या वेळी सर्वसाधारण सभेत पाण्याचा विषय चर्चेत असल्याने विद्यार्थ्यांना पाणीपुरवठा, पाण्याची उपलब्धता आणि जलसंधारणाचे महत्त्व जाणून घेण्याची संधी मिळाली. हातात डायरी आणि पेन घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांनी सभेतील चर्चेच्या नोंदी केल्या. तसेच मोरबे धरणातील पाणीसाठ्याबाबत लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारून आपल्या जिज्ञासेला वाट मोकळी करून दिली.
लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधींची भूमिका काय असते, नागरिकांच्या प्रश्नांवर निर्णय कसे घेतले जातात आणि शहराच्या विकासासाठी महापालिका कोणत्या प्रकारे काम करते, याची माहिती या भेटीतून विद्यार्थ्यांना मिळाली. त्यामुळे वर्गातील अभ्यासाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली.
या उपक्रमासाठी स्थानिक नगरसेवक सचिन लोटे आणि गिरीश म्हात्रे यांनी प्रोत्साहन दिले. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी भेटीसाठी आवश्यक परवानगी दिली. या सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापनाने आभार व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.